पुढारी ऑनलाईन डेस्क : आग्र्यातील ताजमहलहून दुप्पट आकाराचा एक ॲस्टरॉईड (Asteroid) पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या ॲस्टरॉईडचे नाव 2014TN17 असे याचे नाव असून त्याची रूंदी सुमारे 540 फूट (165 मीटर) इतकी आहे. तर त्याचा वेग 77 हजार 282 किलोमीटर प्रतितास इतका आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने ही माहिती दिली आहे.
अंतराळातून येणाऱ्या या महाप्रचंड दगडाचा आकार पाहता तो भारतातील ताजमहलच्याही दुप्पट आकाराचा असल्याचे स्पष्ट होते. हा ॲस्टरॉईड 26 मार्च रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. तो पृथ्वीपासून अवघ्या 5 मिलियन किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. तरीदेखील NASA ने या ॲस्टरॉईडचे वर्णन संभाव्य धोकादायक ॲस्टरॉईड (PHA) या कॅटेगरीत केले आहे. त्यामुळेच त्याच्यावर बारकाईने लक्षदेखील ठेवले जाणार आहे.
पृथ्वीपासून जवळ असलेला आणि भविष्यात धोकादायक ठरू शकेल तसेच पृथ्वीच्या कक्षेत येऊ शकेल किंवा ग्रहांचे गुरूत्वाकर्षणामुळे ज्यांच्या मार्गात बदल होऊन ज्यांची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता असते असे ॲस्टरॉईड पॉसिबली हजार्ड्स ॲस्टरॉईड (PHA) म्हणून वर्गीकृत केले जातात. 2014 TN17 हा ॲस्टरॉईड भविष्यात त्याचा मार्ग बदलू शकतो. म्हणूनच त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
NASA च्या माहितीनुसार, 26 मार्च 2025 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजून 04 मिनिटांनी हा 2014 TN17 ॲस्टरॉईड सुरक्षितपणे पृथ्वीच्या जवळून जाईल. त्याचे पृथ्वीपासूनचे सर्वात जवळचे अंतर 5 मिलियन किलोमीटर असेल. हे अंतर पृथ्वी आणि चंद्रादरम्यानच्या अंतरापेक्षा 13 पट जास्त असले तरीही या ॲस्टरॉईडचे वर्गीकरण PHA मध्ये केलेले आहे.
पृथ्वीजवळील ऑब्जेक्टमध्ये समाविष्ट असलेल्या "अॅपोलो फॅमिली"तील हा ॲस्टरॉईड आहे. पृथ्वीच्या कक्षेच्या मार्गाला भेदून तो जाणार आहे. तथापि, अंतराळातील असे अनेक अशनी सुरक्षितपणे पृथ्वीच्या कक्षेतून जात असतात. पण, त्यांच्या मार्गात बदल झाला तर ते पृथ्वीवर धडकू शकतात. त्यामुळे, खगोलशास्त्रज्ञ अॅपोलो ॲस्टरॉईड्सचे नेहमीच बारकाईने निरिक्षण करतात.
NASA च्या सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था 2014 TN17 सारख्या ॲस्टरॉईड्सना नियमित ट्रॅक करत असतात. त्यासाठी NASA च्या निधीतून तयार केलेल्या टेलिस्कोप्स, रडार प्रणाली आणि जागतिक स्तरावर असलेल्या हौशी खगोलतज्ज्ञांच्या निरीक्षणांचा वापर केला जातो. त्यातूनही बरेचसे ॲस्टरॉईड्स पृथ्वीच्या जवळ येईपर्यंत लक्षातही येत नाहीत. त्यामुळे निरंतर निरीक्षण प्रणालींचे महत्त्व दिसून येते.
2014 TN17 ॲस्टरॉईड पृथ्वीपासून 5 मिलियन किलोमीटर अंतरावरून जाणार असला तरी तरी त्याचा प्रभाव अत्यंत धोकादायक ठरू शकतो. खगोलतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 540 फूट रुंद असलेल्या या ॲस्टरॉईडची पृथ्वीवर टक्कर झाल्यास ती 100 हून अधिक अणुबॉम्बच्या स्फोटाएवढी ताकदीची असेल. अशा धडकेमुळे पृथ्वी नष्ट होण्याचा धोका आहे. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आग आणि वादळे निर्माण होतील. जागतिक पर्यावरणावर अनेक शतके परिणाम होईल. 1908 मध्ये टुंगुस्का येथे एका ॲस्टरॉईडच्या धडकेत 2000 चौरस किलोमीटर जंगल नष्ट झाले होते. तो ॲस्टरॉईड 2014 TN17 च्या अर्ध्या आकाराचा होता. असा ॲस्टरॉईड पृथ्वीवरील एखाद्या शहरात धडकला तर लाखो लोकांचा जीव जाऊ शकतो.