

पुढारी ऑनलाईन डेस्क : नासाचे अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या ९ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकले होते. आज पहाटे ते दोघेही पृथ्वीवर परतले. ते केवळ ८ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांची पृथ्वीवर परत येण्याची प्रक्रिया 286 दिवसापर्यंत लांबली. यादरम्यान, दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या वेतनाबाबत चर्चा रंगल्या आहेत. या बद्दल आपण या बातमीतून जाणून घेवूया त्यांना नासाकडून किती वेतन मिळू शकते.
एनडीटीवीच्या अहवालानुसार, नासाचे माजी अंतराळवीर कॅडी कोलमन यांनी स्पष्ट केले की, अंतराळवीरांसाठी कोणतेही विशेष ओव्हरटाइम वेतन नाही. ते संघीय कर्मचारी असल्याने, त्यांचा अंतराळात घालवलेला वेळ हा पृथ्वीवरील कोणत्याही नियमित कार्यप्रवासासारखाच मानला जातो. त्यामुळे त्यांना त्यांचे नियमित वेतन मिळत राहते. नासा त्यांच्या जेवण आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहण्याच्या खर्चाची जबाबदारी घेतो. माजी अंतराळवीर कॅडी कोलमन यांच्या मते, अंतराळवीरांना मिळणारे एकमेव अतिरिक्त भत्ता म्हणजे एक छोटासा दैनिक भत्ता, जो केवळ प्रति दिवस 4 डॉलर्स, भारतीय रुपयांमध्ये सुमारे ३४७ रुपये इतका आहे.
2010-11 मध्ये 159 दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी कॅडी कोलमन यांना एकूण सुमारे 636 डॉलर्स म्हणजेच सुमारे 55,000 रुपये अतिरिक्त वेतन मिळाले होते. त्याचनुसार, 9 महिने अंतराळात राहिलेल्या सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना अतिरिक्त 1 हजार 148 सुमारे १ लाख रुपये भरपाई मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ही केवळ अंदाजित रक्कम आहे. NASAने एका अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे की, तांत्रिकदृष्ट्या हे अंतराळवीर अडकलेले नाहीत, तर ते अंतराळ स्थानकात सक्रियपणे कार्यरत आहेत.
नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे GS-15 वेतन ग्रेड अंतर्गत येतात, जो संघीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च वेतनश्रेणी मानला जातो. या श्रेणीनुसार, त्यांचे वार्षिक वेतन $125,133 ते $162,672 म्हणजेच सुमारे १.०८ कोटी रुपये ते १.४१ कोटी रुपये आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ९ महिने कार्यरत राहिल्यामुळे, त्यांना या कालावधीसाठी $93,850 ते $122,004 म्हणजेच सुमारे ८१ लाख रुपये ते १.०५ कोटी रुपये इतका वेतन मिळेल. याशिवाय, अतिरिक्त भरपाई म्हणून त्यांना $1,148 (सुमारे १ लाख रुपये) दिले जाण्याची शक्यता आहे. या सर्वांचा एकत्रित विचार करता, त्यांची एकूण कमाई अंदाजे $94,998 ते $123,152, म्हणजेच सुमारे ८२ लाख रुपये ते १.०६ कोटी रुपये एवढी होईल..