लेबनॉनमधील सशस्त्र गट हिजबुल्‍लाने नईम कासिम याची त्यांचा नवीन म्‍होरक्‍या म्हणून निवड केली आहे. (Images source- X)
आंतरराष्ट्रीय

Hezbollah | 'नसराल्लाह'च्या मृत्यूनंतर नईम कासिम आता 'हिजबुल्‍लाह'चा नवा म्‍होरक्‍या

Naim Qassem : नसराल्लाह इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेला होता

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलच्या हल्ल्यात हसन नसराल्लाह ठार झाल्यानंतर लेबनॉनमधील सशस्त्र गट हिजबुल्‍लाहने (Hezbollah) नईम कासिम (Naim Qassem) याची त्यांचा नवीन म्‍होरक्‍या म्हणून निवड केली आहे. हिजबुल्लाहने मंगळवारी निवेदन जारी करत म्हटले आहे की, माजी सरचिटणीस हसन नसराल्लाह यांच्यानंतर आता नईम कासिम हिजबुल्लाहचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतील. नसराल्लाह एका महिन्यापूर्वी बेरूतच्या दक्षिणी उपनगरात झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेला होता.

Who is Naim Qassem? कोण आहे नईम कासिम?

हिजबुल्लाहच्या तत्त्वांचे आणि ध्येयांचे पालन केल्यामुळे कासिम यांची या पदासाठी निवड केल्याचा दावा हिजबुल्‍लाहने निवेदनातून केला आहे. ७१ वर्षीय कासिमला अनेकदा हिजबुल्लाहचा “नंबर टू” म्हणून ओळखले जाते. तो १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला हिजबुल्लाहची स्थापना करणाऱ्या नेत्यांपैकी एक आहे. नसराल्लाह मारला गेल्यानंतर, कासीमने तीनवेळा टीव्हीवरून संबोधित केले आहे.

इस्त्रायली हवाई दलाने २७ सप्‍टेंबर रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये जोरदार हवाई हल्ले केले होते. यात हिजबुल्लाहच्या मुख्यालयाचाही समावेश होता. या हवाई हल्ल्यात हसन नसराल्लाह (hassan nasrallah) ठार झाला होता. 

२१ ऑक्टोबर रोजीच्या यूएई येथील एरेम न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, कासीम हा ५ ऑक्टोबर रोजी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी लेबनॉन आणि सीरियाच्या दौऱ्यादरम्यान वापरलेल्या विमानातून बेरूतमधून बाहेर पडला.

 हिजबुल्‍लाहचे नेतृत्त्‍व

१९९२ मध्‍ये हिजबुल्लाहचा तत्‍कालीन म्‍होरक्‍या सय्यद अब्बास मौसावीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्‍यू झाला. इस्‍त्रायलने हा अपघात घडविल्‍याचा आरोप त्‍यावेळी झाला होता. मौसावीच्‍या मृत्‍यूनंतर हिजबुल्ला संघटनेकडे महत्त्‍वाचे पद हसन नसराल्लाहकडे (hassan nasrallah) आले. त्यानंतर पाच वर्षांनी अमेरिकेने हिजबुल्लाला दहशतवादी संघटना घोषित केले. १९९७ मध्ये हसन नसराल्लाह याचा मोठा मुलगा हादी हा इस्रायली सैन्याविरुद्धच्या लढाईत ठार झाला. त्यानंतर सप्‍टेंबर २०२४ मध्ये झालेल्या हल्ल्यात नसराल्लाह ठार झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT