Mehul Choksi, Lawyer Vijay Aggarwal  File Photo
आंतरराष्ट्रीय

Mehul Choksi Lawyer Arrested: मेहुल चोकसीचा वकील विजय अग्रवालला लंडनमध्ये अटक; दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीची केस लढणारे भारतीय वकील विजय अग्रवाल यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे.

मोहन कारंडे

Mehul Choksi Lawyer Arrested

लंडन: फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीची केस लढणारे भारतीय वकील विजय अग्रवाल यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. दोन महिलांवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, सध्या त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. या प्रकरणात अग्रवाल यांची वैयक्तिक सहाय्यक मनप्रीत कौर हिलादेखील गुन्ह्यास फूस लावल्याच्या आरोपाखाली अटक करून कोठडी सुनावण्यात आली आहे.

लंडनच्या पॉश मेफेयर भागातील एका अत्यंत आलिशान सर्व्हिस टाउन हाऊसमध्ये राहणाऱ्या या दोघांना ११ ऑगस्ट रोजी मेट्रोपॉलिटन पोलिसांकडून अटक करण्यात आली. या टाउन हाऊसचे एका रात्रीचे भाडे तब्बल २.६ लाख रुपये इतके आहे. पोलिसांना या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटनांची माहिती मिळाली होती. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले असता दोघांवरही अधिकृतपणे आरोप निश्चित करण्यात आले.

नोकरीचे खोटे आमिष दाखवून बोलावले अन्...

न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, अग्रवाल यांच्यावर ९ ऑगस्ट रोजी एका महिलेवर तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यांनी महिलेच्या तिच्या संमतीशिवाय विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. तसेच, २६ मे रोजी घडलेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर आणखी एक आरोप ठेवण्यात आला आहे.

दुसरीकडे, मनप्रीत कौर हिने नोकरीची खोटी जाहिरात देऊन दोन महिलांना अग्रवाल यांच्याकडे कामासाठी बोलावले आणि गुन्ह्यात मदत केली, असा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

या हाय-प्रोफाइल प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी 'साउथवार्क क्राउन कोर्टात' होणार असून, तोपर्यंत दोन्ही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या अन्य दोन संशयितांना (एक २३ वर्षीय पुरुष आणि ४३ वर्षीय महिला) चौकशी प्रलंबित ठेवून जामिनावर सोडण्यात आले असून, पीडित महिलांना सध्या विशेष सुरक्षा पुरवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT