South Africa mass shooting
जोहान्सबर्ग : देशात सामूहिक गोळीबाराची घटना ताजी असतानाच दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहराबाहेरील एका वस्तीत अज्ञात बंदूकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडत ओह. या हल्ल्यात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. एका महिन्यात सामूहिक गोळीबाराची दुसरी मोठी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रस्त्यांवर फिरणाऱ्यांवरही गोळीबार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गपासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या 'बेकर्सडल' (Bekkersdal) परिसरात ही घटना घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. "काही पीडितांवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी रस्त्यावर चालत असताना अचानक आणि विनाकारण गोळीबार केला," असे स्थानिक पोलीस निवेदनात म्हटले आहे.
मृतांच्या आकड्याबाबत संभ्रम सुरुवातीला मृतांचा आकडा १० असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर तो ९ वर सुधारण्यात आला. हा गोळीबार एका स्थानिक खानावळी (टॅव्हर्न) किंवा अनधिकृत बारजवळ झाला. बेकर्सडल हा परिसर दक्षिण आफ्रिकेतील मोठ्या सोन्याच्या खाणींजवळ असलेला वस्तीचा भाग आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महिन्यातील दुसरी घटना दक्षिण आफ्रिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याआधी ६ डिसेंबर रोजी प्रिटोरिया या राजधानीच्या शहरात एका हॉस्टेलमध्ये घुसून बंदूकधाऱ्यांनी १२ जणांची हत्या केली होती, ज्यामध्ये एका तीन वर्षांच्या चिमुरड्याचाही समावेश होता. या ताज्या घटनेमुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.