प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Mexico mass shooting : मेक्सिकोमध्ये धार्मिक उत्‍सवात अंदाधुंद गोळीबार, १२ ठार

मृतात अल्‍पवयीन मुलाचा समावेश, 'नेटिव्हिटी ऑफ जॉन द बॅप्टिस्ट' उत्‍सवात धक्‍कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

मेक्सिकोमधील इरापुआटो शहरात येथे बुधवारी रात्री (दि. २५ जून) उशिरा एका समारंभादरम्यान काही अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्‍ये अल्‍पवयीन मुलाचा समावेश आहे. हिंसाचारग्रस्त ग्वानाहुआटो राज्यातील ॲटर्नी जनरलच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात जखमी झालेल्या अन्य २० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.

अंदाधूंद गोळीबाराचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल

'नेटिव्हिटी ऑफ जॉन द बॅप्टिस्ट' या कॅथोलिक सणानिमित्त आयोजित उत्सवात लोक रस्त्यावर नाचत होते. यावेळी अंदाधूंद गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उत्सवाच्या जल्लोषात अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आला. लोकांच्‍या किंकाळ्या ऐकू येतात. तसेच आणि जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागल्‍याचेही दिसते. दरम्‍यान, या हल्‍ल्‍यात मृतांचा आकडा १२ वर पोहोचला असून, सुमारे २० जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबाम यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

ग्‍वानाहुआटो देशातील सर्वात हिंसाचारग्रस्‍त राज्‍य

गेल्या महिन्यातही ग्वानाहुआटोमधील सॅन बार्टोलो डे बेरिओस येथे कॅथोलिक चर्चने आयोजित केलेल्या एका पार्टीला लक्ष्य करून करण्यात आलेल्या गोळीबारात सात जण ठार झाले होते. मेक्सिको सिटीच्या वायव्येस असलेले ग्वानाहुआटो हे देशातील सर्वात हिंसक राज्यांपैकी एक बनले आहे, येथे विविध संघटित गुन्हेगारी टोळ्यांमध्‍ये वर्चस्वासाठी रक्‍तरंजित संघर्ष सुरु आहे. या वर्षात आतापर्यंत या राज्यात हत्येच्या १,४३५ घटना घडल्या आहेत. मेक्‍सिकोमधील अन्‍य राज्‍यांच्‍या तुलनेत ही आकडेवारी दुप्पट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT