marijuana drug for back pain file photo
आंतरराष्ट्रीय

Marijuana Drug: गांजापासून बनवलेल्या औषधाने पाठदुखी होते कमी; नव्या अभ्यासात निष्कर्ष

marijuana drug for back pain: गांजापासून तयार केलेल्या औषधाने पाठीच्या दीर्घकालीन वेदनांवर यशस्वी परिणाम दाखवले आहेत. ८०० रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला.

मोहन कारंडे

marijuana drug

वॉशिंग्टन: गांजाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या औषधाने तीव्र पाठदुखी कमी केल्याचे एका मोठ्या वैद्यकीय अभ्यासातून समोर आले आहे. या निष्कर्षामुळे दीर्घकालीन वेदनांवर गांजाचा वापर उपयुक्त ठरू शकतो, याला आणखी आधार मिळाला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

जर्मनीतील 'व्हर्टॅनिकल' (Vertanical) या औषधनिर्मात्या कंपनीने केलेल्या ८०० रुग्णांवरील अभ्यासात गांजाचे चिकित्सक गुणधर्म स्पष्ट झाले. अमेरिकेत गांजा अजूनही केंद्रीय कायद्यानुसार अवैध असला तरी, अनेक राज्यांनी त्याला वैद्यकीय वापरासाठी मान्यता दिली आहे.

नवीन औषधात टीएचसीचा 'मायक्रोडोज'

नवीन औषधात टीएचसी (THC) हा नशा निर्माण करणारा घटक अल्प प्रमाणात आहे. टीएचसीचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे 'मायक्रोडोज' इतके ठेवण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना नशा जाणवली नाही, तसेच औषधाचे व्यसन होत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी कॅनडा आणि युरोपमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे होणाऱ्या मज्जातंतूंच्या वेदनांसह अनेक प्रकारच्या वेदनांसाठी फार्मास्युटिकल-ग्रेड गांजाला मान्यता मिळाली आहे.

ओपिओइड्स आणि इतर औषधांपेक्षा सुरक्षित

पाठदुखी ही लाखो लोकांना होणारी एक सामान्य समस्या आहे, ज्यावर प्रभावी उपचारांची कमतरता आहे. आयबुप्रोफेनसारखी सामान्य वेदनाशामक औषधे दीर्घकाळ वापरल्यास पोटात अल्सरसारखे दुष्परिणाम होतात. तर, व्यसनाच्या धोक्यामुळे ओपिओइड्स (उदा. ऑक्सिकॉन्टिन) ची शिफारस करणे आता बंद झाले आहे. या पार्श्वभूमीवर, या नवीन अभ्यासाचे प्रमुख डॉ. मॅथियास कर्स्ट यांनी सांगितले की, "गांजा दीर्घकाळापासून पाठदुखी असलेल्या रुग्णांमध्ये वेदना लक्षणीयरीत्या कमी करू शकते आणि शारीरिक कार्य सुधारू शकते, शिवाय ओपिओइड्सशी संबंधित सुरक्षा समस्यांचा धोकाही नसतो."

नवीन अभ्यासात काय आढळले?

  • नवीन अभ्यासासाठी, पाठदुखी असलेल्या रुग्णांना दोन गटात विभागण्यात आले. एकाला व्हर्टॅनिकलचा खास गांजाचा अर्क तर दुसऱ्याला प्लेसबो (साधे औषध) देण्यात आले.

  • १२ आठवड्यांनंतर औषध घेणाऱ्या रुग्णांच्या वेदनांमध्ये ११ पैकी जवळपास २ गुणांनी घट झाली, तर प्लेसिबो गटात ती घट १.४ गुणांवर होती.

  • या औषधामुळे रुग्णांची झोप आणि शारीरिक कार्यक्षमता देखील सुधारल्याचे दिसून आले.

  • या औषधाचे दुष्परिणाम (उदा. चक्कर, डोकेदुखी) होते, ज्यामुळे त्यामुळे १७% रुग्णांना औषध थांबवावे लागले. मात्र, हे प्रमाण ओपिओइड्सच्या रुग्णांपेक्षा कमी होते.

  • ६ महिन्यांच्या पुढील टप्प्यात औषध सुरू ठेवणाऱ्या रुग्णांच्या वेदना आणखी कमी झाल्या. संशोधनाचे निष्कर्ष नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

  • व्हर्टॅनिकल कंपनीने युरोपातील नियामकांकडे त्यांच्या औषधाच्या मंजुरीसाठी अर्ज दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT