Marco Rubio India visit file photo
आंतरराष्ट्रीय

Marco Rubio: पाकिस्तानसोबतचे संबंध भारत-अमेरिका मैत्रीच्या आड येणार नाहीत; परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ नेमकं काय म्हणाले?

पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशासोबतचे अमेरिकेचे असलेले संबंध भारतासोबतच्या मैत्रीच्या आड येणार नाहीत," असा पुनरुच्चार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी रविवारी केला.

मोहन कारंडे

Marco Rubio

नवी दिल्ली: "भारत आणि अमेरिकेतील संंबंध अजिबात कमी झालेले नाहीत. पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशासोबतचे अमेरिकेचे असलेले संबंध भारतासोबतच्या मैत्रीच्या आड येणार नाहीत," असा पुनरुच्चार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी रविवारी केला. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांची गती कायम असून, उभय देशांमधील धोरणात्मक, आर्थिक आणि भूराजकीय क्षेत्रांतील सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ भारत दौऱ्यावर आहेत. आज माध्यमांशी बोलताना रूबिओ म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापारी संबंधांबाबत कोणतीही काल्पनिक भीती निर्माण केलेली नाही. उलट, त्यांनी जागतिक व्यापार संतुलनातील त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश येत्या काळात द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम रूप देण्याबाबत अत्यंत सकारात्मक आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'पाकिस्तानशी संबंध केवळ गरजेपुरतेच'

पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रूबिओ यांनी सांगितले की, अमेरिका जगातील अनेक देशांशी केवळ तात्कालिक किंवा गरजेपुरते संबंध ठेवते. मात्र, असे संबंध प्रस्थापित करताना भारतासोबतच्या धोरणात्मक भागीदारीला कधीही धक्का पोहोचवला जाणार नाही. अमेरिका आपले आंतरराष्ट्रीय संबंध विशिष्ट हितसंबंध आणि प्राधान्यक्रमानुसार हाताळते; परंतु भारतासोबतच्या मजबूत संबंधांना अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात सर्वोच्च स्थान आहे, असे रुबिओ यांनी सांगितले.

इराण अणुकराराबाबत जगाला लवकरच 'आनंदाची बातमी'?

इराणसोबतच्या सुरू असलेल्या शांतता प्रस्तवाबाबत ते म्हणाले की, "पुढील काही तासांत कदाचित जगाला एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे." या संभाव्य करारामुळे जगाला इराणच्या अणू शस्त्रास्त्रांच्या भीतीपासून कायमची मुक्ती मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

ऊर्जा स्रोतांच्या विविधतेवर भारताचा भर: एस. जयशंकर

यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जागतिक ऊर्जा बाजारातील स्थिरतेला भारताचा पाठिंबा असल्याचे सांगितले. 'होर्मूझची सामुद्रधुनी' परिसरातील वाढत्या तणावाचा विचार करता, भारत आपल्या देशांतर्गत गरजांसाठी ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण करणे सुरूच ठेवेल, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT