Los Angeles Curfew : हिंसक निदर्शने, जाळपोळ आणि लूटमारीच्या घटनेनंतर मंगळवारी रात्रीपासून लॉस एंजेलिसमध्ये आंशिक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात पुढील काही दिवस रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल, असे लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील हिंसाचाराच्या घटनांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमध्ये सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले. एका अंदाजानुसार, देशातील या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरात नॅशनल गार्ड आणि मरीनसह सुमारे ५००० सैनिक तैनात करण्यात आले आहेत. शहरात सैन्य तैनात करणे हा लोकशाहीवर हल्ला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे लष्करी सापळा रचत आहेत, असा आरोप कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी केला आहे.
कॅलिफोर्नियाचे राज्यपाल म्हणाले की, त्यांच्या संमतीशिवाय किंवा पाठिंब्याशिवाय कॅलिफोर्नियामध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्याचा ट्रम्पचा निर्णय इतर राज्यांना इशारा देण्यासारखा आहे. आज लॉस एंजेलिसमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या कृती इथेच संपणार नाहीत, असा इशाराही न्यूसम यांनी दिला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी न्यायालयातही धाव घेतली आहे.
संचारबंदी लागू केलेल्या परिसरात निदर्शन करण्यासाठी उतरलेल्यांना अटक करण्यात येत आहे. बेकायदेशीर सभेच्या ठिकाणी अनेकांना अटक करण्यात आली आहेत, अशी माहिती लॉस एंजिलस पोलिसांनी दिली आहे.
अमेरिकेच्या लॉस एजेलिसमध्ये अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम राबण्यात आली. यावेळी ४४ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. यानंतर स्थलांतरित धोरणाविरुद्ध शहरात हिंसाचाराच्या घटना सुरु घडल्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शहरात दाेन हजार राष्ट्रीय रक्षक तैनात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यानंतरही हिंसाचाराच्या घटना सुरुच राहिल्याने आता नॅशनल गार्डची संख्या पाच हजार केली आहे. ट्रम्प यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे.