polar night Longyearbyen Norway island without sun
लॉन्गइयरबायेन (नॉर्वे): कल्पना करा, सकाळी ८ वाजता तुम्ही कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडता आणि बाहेर मध्यरात्रीसारखा काळोख आहे... दुपारी जेवणाच्या सुट्टीत बाहेर पडता, तेव्हाही डोक्यावर चांदण्या चमकत आहेत आणि संध्याकाळी घरी परततानाही तोच दाट अंधार. आपण पावसाळ्यात एखादा दिवस सूर्य दिसला नाही तरी अस्वस्थ होतो, पण जगाच्या नकाशावर एक असे ठिकाण आहे जिथे लोक सलग ४ महिने सूर्याच्या दर्शनाशिवाय राहतात.
नॉर्वेमधील 'लॉन्गइयरबायेन' या बेटावर सुमारे २,५०० नागरिक दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अशा अनाकलनीय अंधारात जगतात. विज्ञानाच्या भाषेत याला 'पोलर नाईट' (ध्रुवीय रात्र) म्हणतात.
या बेटावर निसर्गाचे नियम वेगळे आहेत. इथे सकाळ आणि रात्रीत काहीच फरक नसतो. येथील लोकांची दिनचर्या सूर्याच्या किरणांवर नाही, तर केवळ घड्याळाच्या काट्यांवर चालते. सूर्य नसल्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी येथील नागरिक दररोज 'व्हिटॅमिन-डी'च्या गोळ्या घेतात. इतकेच नाही तर घरांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा भास निर्माण करणारे विशेष 'लाईट थेरपी' लॅम्प्स वापरले जातात.
प्रदीर्घ काळ अंधारात राहिल्याने नैराश्य येण्याचा धोका असतो. यावर मात करण्यासाठी येथील लोकांनी 'कोसेलिग' नावाची एक खास जीवनशैली आत्मसात केली आहे. याचा अर्थ आहे 'उबदारपणा आणि जवळीक'. लोक आपली घरे मेणबत्त्यांनी उजळून टाकतात. अंधाराला दोष देण्याऐवजी तिथे दररोज संध्याकाळी कोणाच्या तरी घरी संगीत, खेळ आणि गरम कॉफीच्या मैफली जमतात.
येथील जीवन केवळ अंधारामुळेच नाही, तर इतर संकटांमुळेही आव्हानात्मक आहे. घराबाहेर पडताना कडाक्याची थंडी (उणे ३० अंश सेल्सिअस) आणि पांढरी अस्वले यांपासून संरक्षण करणे अनिवार्य असते. या बेटावर माणसांपेक्षा अस्वलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी आणि अंधारात ओळख पटण्यासाठी लोक नेहमी हेडलाईट्स आणि रिफ्लेक्टीव्ह जॅकेट्स घालूनच फिरतात.
फेब्रुवारीच्या शेवटी जेव्हा सूर्य पहिल्यांदा पुन्हा दर्शन देतो, तो दिवस या लोकांसाठी एखाद्या पुनर्जन्मासारखा असतो. शहरातील एका जुन्या हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर जेव्हा सूर्याचे पहिले किरण पडते, तेव्हा संपूर्ण गाव तिथे जमा होऊन 'सोलफेस्टुका' नावाचा सण साजरा करतो. तो क्षण अत्यंत भावूक असतो, कारण तब्बल १२० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना प्रकाशाची भेट झालेली असते.