Nepal KP Sharma Oli  file photo
आंतरराष्ट्रीय

Nepal KP Sharma Oli Arrest: नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना आज पहाटे अटक करण्यात आली.

मोहन कारंडे

Nepal KP Sharma Oli Arrest

काठमांडू: नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, 'जनरेशन झेड' आंदोलकांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी केलेल्या हिंसक दडपशाहीप्रकरणी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना आज पहाटे अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, रॅपर आणि लोकप्रिय नेते बालेन शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शुक्रवारी शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ओली यांच्यासोबतच नेपाळी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही त्यांच्या भक्तपूर येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यूंना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषसिद्ध झाल्यास त्यांना १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

नेपाळमध्ये नेमकं काय घडलं होतं?

सप्टेंबर २०२५ मध्ये के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारच्या विरोधात नेपाळमधील तरुणांनी एल्गार पुकारला होता. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय अस्थिरतेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या 'डिजिटल क्रांती'ने अल्पावधीतच उग्र रूप धारण केले होते. हे आंदोलन चिरडण्यासाठी तत्कालीन सरकारने बळाचा वापर केला होता, ज्यामध्ये ७६ जणांचा मृत्यू झाला, तर २ हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.

या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय आयोगाने आपल्या अहवालात ओली यांना थेट जबाबदार धरले आहे. अहवालानुसार, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या गोळीबारात १९ तरुण आंदोलकांचा बळी गेला, जो रोखण्यात ओली अपयशी ठरले. देशाचे कार्यकारी प्रमुख म्हणून झालेल्या सर्व चांगल्या-वाईट घटनांची जबाबदारी ओली यांचीच आहे. आयोगाने केवळ ओलीच नव्हे, तर माजी गृहमंत्री रमेश लेखक आणि तत्कालीन पोलीस प्रमुख चंद्र कुबेर खापुंग यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT