नेपाळमधील सत्तांतर

नव्या पिढीने बदलले नेपाळच्या सत्तेचे समीकरण
Nepal Politics
नेपाळमधील सत्तांतर(Pudhari File Photo)
Published on
Updated on

नेपाळमध्ये 5 मार्चला सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. तेथील तरुणांनी तर अक्षरशः क्रांतीच घडवली. सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या जेन-झी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 75च्या वर लोक मृत्युमुखी पडले होते. अनेक बड्या नेत्यांना लोकांनी मारहाण केली आणि जीव मुठीत धरून त्यांना पळावे लागले. देशाचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी समाजमाध्यमांचा वापर करून असंख्य तरुणांनी एकजुटीने आंदोलन केले आणि प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांना थेट आव्हान दिले. आता पार पडलेल्या निवडणुकीत बालेंद्र शहा ऊर्फ बालेन यांचा राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (आरएसपी) बहुमताने विजयी झाला असून, ही नेपाळमधील बदलाची निशाणीच म्हणावी लागेल. नेपाळचे भावी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ते बालेन अवघे 35 वर्षांचे असून, व्यवसायाने ते अभियंता आहेत. मुळात ते प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार असून, त्यांचे अनेक टीव्ही शो, रॅप व म्युझिक व्हिडीओ गाजले आहेत. बालेन यांच्याकडे अनेक लक्झरी वाहने असून, त्यांची जीवनशैली कायम चर्चेत असते; परंतु युवकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. 2022 मध्ये त्यांनी निवडणूक जिंकून काठमांडूचे महापौरपद सांभाळले होते आणि कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन याबाबत अनेक सुधारणा घडवल्या. गेल्या वर्षीच्या आंदोलनात त्यांचे नेतृत्व उजळून निघाले आणि त्यांनी आपल्या पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. देशात गेल्या 18 वर्षांत 14 वेळा सरकार बदलले गेले आणि त्यामुळे राजकीय स्थैर्य संपुष्टात आले होते. संधिसाधू राजकीय पक्ष व नेत्यांना लोक अक्षरशः विटले होते. केवळ चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आरएसपीला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला असून, त्यावरून लोकांना परिवर्तन हवे होते, हे स्पष्ट होते. 275 जागांसाठी निवडणूक झाली. थेट मतदानातून 165 सदस्य निवडले गेले आणि उर्वरित 110 सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या कोट्यातून निवडले जाणार आहेत. ओली यांच्यासह अनेक माजी पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि मंत्र्यांचा दारुण पराभव झाला. ओली हे नेपाळच्या राजकारणातील भीष्मपितामह मानले जाणारे वजनदार नेते आहेत. मागच्या पाच दशकांपासून ते राजकारणात सक्रिय असून, बालेन यांनी त्यांचा पराभव केला. देशाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रशासकीय अनुभवाची आवश्यकता आहे, असे ओली यांनी ठासून सांगितले; परंतु ‌‘अनुभवी‌’ नेत्यांनीच नेपाळचा घात केला असून, आता परिवर्तनाची वेळ आली असल्याचा नारा बालेन यांनी दिला. भष्टाचार, बेरोजगारी आणि घराणेशाहीला कंटाळलेला युवावर्ग जुन्याजाणत्या सत्ताधाऱ्यांच्याच विरोधात गेला. समाजमाध्यमांवर बालेन यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. देशात तरुणांचे प्रमाण जवळपास 40 टक्के आहे. या डिजिटल ताकदीचे मतपेटीत प्रतिबिंब पडल्याचे दिसते. नेपाळी काँग््रेास आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) हे पक्ष खूप मागे राहिले. नेपाळी कम्युनिस्ट पक्षात कम्युनिस्टांचे 19 गट सामील आहेत. त्यात सर्वात मोठा गट हा पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड आणि युनायटेड सोशॅलिस्टच्या माधवकुमार नेपाल यांचा आहे. अनेक नेते पराभूत झाले असले, तरी प्रचंड हे विजयी झाले. नेपाळी काँग््रेास, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल (यूएमएल), कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल (माओइस्ट सेंटर), राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टी या पक्षांना निवडणुकीत फटका बसला. नेपाळी काँग््रेास हा सर्वात जुना पक्ष असून, त्याची स्थापना 1950 मध्ये झाली होती. राणांची एकाधिकारशाही संपुष्टात आणून लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बी. पी. कोईराला यांनी हा पक्ष स्थापन केला होता. दोन महिन्यांपूर्वी नेपाळी काँग््रेासने पाचवेळा पंतप्रधान झालेले शेरबाहदूर देउबा यांच्याऐवजी अवघ्या 49 वर्षांच्या गगन थापा यांना पक्षाध्यक्ष केले. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा नेपाळी काँग््रेासलाच मिळाल्या होत्या, तर यूएमएलला 78, माओइस्टला 32 आणि राजेशाहीचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक पार्टीला 14 जागा प्राप्त झाल्या होत्या.

‌‘जेन-झी‌’ चळवळीमुळे नेपाळी काँग््रेासच्या नेतृत्वात बदल झाला. प्रचंड यांनी नेपाळी काँग््रेासशी झालेली आघाडी तोडून यूएमएलबरोबर सरकार स्थापन केले आणि ते स्वतः पंतप्रधान झाले होते. दोन वर्षांपूर्वी यूएमएलचे ओली हे नेपाळी काँग््रेासशी सहकार्य करून पंतपधान झाले होते. नेपाळी काँग््रेास आणि भारत यांचा संबंध जुना आहे. प्रचंड यांनीदेखील तीनवेळा पंतप्रधानपद भूषवले. 1996 ते 2006 या काळात राजेशाहीविरोधात त्यांनी सशस्त्र लढा दिला आणि त्यानंतरच नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली; परंतु त्यांच्या विरोधातही अनेक आरोप झाल्यानंतर त्यांची प्रतिमा खराब झाली. 1990 मध्ये स्थापन झालेला राष्ट्रीय प्रजासत्ताक पार्टी हा राजेशाहीचे समर्थन करणारा पक्ष, तर आरएसपी या पक्षाची स्थापना रवी लामछिने यांनी 2022 मध्ये केली. पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 20 जागा मिळाल्या. बालेन यांनी त्यांच्याच पक्षात प्रवेश केला असून, आता देशभर त्यांची लोकप्रियता पसरलेली आहे. आज चांगल्या आर्थिक संधी व सुविधांच्या अभावामुळे फक्त कामगारच नव्हे, तर हजारो विद्यार्थीदेखील परदेशांत जात आहेत. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक भष्ट देशांमध्ये या देशाचा समावेश होतो. देशातील अनेक नेते हे जमीन घोटाळे आणि लाचखोरीत अडकले आहेत. त्यातच गेल्यावर्षी तत्कालीन सरकारने समाजमाध्यमांवर बंदी घातल्यामुळे लाखो तरुण खवळले होते. शिवाय ‌‘नेपो किडस्‌‍‌’च्या विरोधातील मोहीम ट्रेंडिंगमध्ये होती. तंत्रज्ञानामुळे लोकांमधील अस्वस्थता स्फोटात चटकन परिवर्तित होते. शिक्षण, आरोग्य आणि नोकऱ्या हे प्रश्न लवकरात लवकर न सोडवल्यास लोक प्रस्थापित सरकारला सुरुंग लावतात. या शेजारी देशात लोकशाही क्रांती प्रत्यक्षात आल्यानंतर आता राज्याचा कारभार सुरळीत करणे आणि तरुणांचे प्रश्न कुशलतेने सोडवण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर आहे. त्याचबरोबर चीनच्या प्रभावाखाली न येता भारताशी सौहार्दपूर्ण सहकार्य ठेवण्याचेही आहे. येत्या काळात काय आणि कसे, ते स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news