Hair Dye Side Effects:
नवी दिल्ली : तरुणाईमध्ये असलेल्या फॅशन आणि सेलिब्रिटींना फॉलो करण्याच्या वेडापायी एका २० वर्षीय चिनी तरुणीला आपले आरोग्य गमवावे लागले आहे. वारंवार केस रंगवल्यामुळे या तरूणीच्या शरीरात विषारी रसायने गेली. त्यामुळे किडनीचा गंभीर आजार झाला असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
'हुआ' नावाची ही तरुणी आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचे अनुकरण करत असे. आपल्या स्टारने केसांचा जो रंग ठेवला आहे, तसाच रंग करण्यासाठी ती नेहमी सलूनमध्ये जाऊन केसांना रंग करत असे. दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टच्या (SCMP) वृत्तानुसार, ती साधारण महिन्यातून एकदा केस रंगवत होती.
'द टाईम्स ऑफ इंडिया' ने दिलेल्या वृत्तानुसार, केस रंगवण्याचे हे वेड तिला महागात पडले. काही दिवसांतच तिच्या पायांवर लाल डाग, पोटदुखी आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसू लागली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तिला मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे निदान झाले.
झेंगझोऊ पीपल्स हॉस्पिटलमधील डॉक्टर ताओ चेनयांग यांनी सांगितले की, हेअर डायमध्ये असलेल्या धोकादायक विषारी पदार्थांमुळे तरुणीच्या शरीरात विषबाधा झाली आणि त्यामुळे तिच्या मूत्रपिंडांना सूज आली, परिणामी मूत्रपिंडाचे कार्य बिघडले.
डॉक्टरांनी हेअर डायच्या दुष्परिणामांविषयी गंभीर इशारा दिला आहे. हेअर डायमध्ये असलेले शिसे आणि पारा यांसारखे विषारी घटक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. यामुळे मूत्रपिंडाचे आणि श्वसनमार्गाचे कार्य पूर्णपणे थांबणे तसेच कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो.
या घटनेनंतर चिनी सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी विशेषतः के-पॉप कलाकारांच्या सतत बदलणाऱ्या हेअर कलरच्या ट्रेंडकडे बोट दाखवले आहे आणि तरुणांनी अंधानुकरण करण्याच्या धोक्यावर आवाज उठवला आहे. निष्काळजीपणामुळे आपले आरोग्य गमावणे मूर्खपणाचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.