Pakistan Afghanistan Conflict Khawaja Asif :
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष तीव्र होत असून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानमधील राहणाऱ्या सर्व अफगाणी लोकांनी आपल्या देशात परत जावे असे वक्तव्य केलं आहे. त्यांनी अफगाणिस्तानसोबतचं जुनं नातं संपुष्टात आलं आहे असं देखील म्हणाले.
ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानात राहणाऱ्या सर्व अफगाणी नागरिकांना त्यांच्या देशात परतावं लागेल. काबूलमध्ये आता त्यांचं सरकार आहे. ही आमची जमीन आणि संपत्ती आहे. ही २५ कोटी पाकिस्तान्यांची जमीन आहे. अशी सोशल मीडियावर पोस्ट केली.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेली ही पोस्ट महत्वाची मानली जात आहे. या दोन्ही देशांनी ४८ तासांचा युद्धविराम घोषित केला होता. मात्र त्यानंतरही पाकिस्ताननं ड्युरंड लाईनजवळील पक्तिका प्रांतात एअर स्ट्राईक केल्याचा आरोप तालिबाननं केलं आहे.
एएफपी वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यानंतर एका वरिष्ठ तालिबानी अधिकाऱ्यानं सांगितलं की आता दोन्ही देशांमधला युद्धविराम संपुष्टात आला आहे.
दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध आता पूर्ववत करण्याची जोखीम पाकिस्तान घेऊ शकत नाही. पाकिस्ताननं बराच काळ धीर धरला होता. मात्र अफगाणिस्तानकडून आता कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळत नाहीये.
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानी सीमेवर दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांबाबत अफगाणिस्तानला ८३६ विरोध पत्रे आणि १३ डेमार्श दिले होते. आता फक्त पत्र पाठवून शांततेचं आवाहन केलं जाईल असं होणार नाही. पाकिस्तानचं कोणतंही शिष्टमंडळ हे काबुल जाणार नाही. आसिफ यांनी जिथून हा दहशतवाद येत आहे त्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. असं देखील सांगितलं.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारवर ते भारताचे प्रतिनिधी असल्यासारखं काम करत आहेत असा आरोप केला. भारत आणि प्रतिबंधित तहरीक ए तालिबान पाकिस्तान एकत्र मिळून पाकिस्तानविरूद्ध कट रचत आहे. त्यांनी सांगितलं की काबुलचे सरकार भारतासोबत असून पाकिस्तानविरूद्ध कट कारस्थान रचत आहे. आधी ते आमच्या संरक्षणात होते आणि आमच्या देशात लपले होते.
आसिफ यांनी पाकिस्तान संरक्षणाच्या दृष्टीनं तयार असून सीमेवर कोणताही हल्ला केला गेला तर त्याचं चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. जर अफगाण तालिबानला युद्ध हवं असेल तर पाकिस्तान त्यांची युद्धाची इच्छा पूर्ण करेल.
आसिफ यांनी सांगितलं की २०२१ नंतर तालिबान सत्तेत आल्यावर पाकिस्तानच्या मानवी आणि सुरक्षा क्षेत्रात मोठे नुकसान झालं आहे. त्यांनी १० हजार ३४७ दहशतवादी हल्ले घडवले. ज्यामध्ये नागरिक आणि सुरक्षा दलाचे असे मिळून ३ हजार ८४४ लोक मरण पावले आहेत.
ख्वाचा म्हणतात, पाकिस्तान सतत अफगाणिस्तानच्या जमिनीचा पाकिस्तानविरूद्ध वापर होऊ नये अशी मागणी करत होता. मात्र काबुल सतत या गोष्टी नाकारत आहे. तो अफगाणिस्तानच्या जमिनीचा कोणत्याही शेजारी देशाविरूद्ध वापर केला जात नाहीये असं म्हणतोय.