Harpreet Singh Happy Passia  x
आंतरराष्ट्रीय

Harpreet Singh Happy Passia | पंजाबमध्ये 16 बॉम्बस्फोटांतील फरार खलिस्तानी दहशतवाद्याला भारतात आणणार; अमेरिकेत FBI ने केली अटक

Harpreet Singh Happy Passia | एनआयएने त्याच्यावर 5 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते; मूळचा अमृतसरचा रहिवासी, 30 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

Harpreet Singh Happy Passia to be brought to India from US

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी पासिया, जो सध्या अमेरिकेत अटकेत आहे आणि ज्याच्यावर पंजाबमधील 16 स्फोटांशी संबंधित असल्याचा आरोप आहे, त्याला लवकरच भारतात परत आणण्यात येणार आहे.

अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन (FBI) आणि इमिग्रेशन अ‍ॅन्ड कस्टम्स एनफोर्समेंट (ICE) ने एप्रिल महिन्यात त्याला अटक केली होती.

काय आहे प्रकरण?

हरप्रीत सिंग हा पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी असून त्याच्यावर 30 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने बाबर खालसा इंटरनॅशनल (BKI) या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी दहशतवादी संघटनेत सामील होऊन पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI बरोबरही हातमिळवणी केल्याचा आरोप आहे.

त्याने पंजाबमधील पोलीस ठाण्यांवर हातगोळ्यांद्वारे हल्ले केले असून, असे हल्ले त्याने अमेरिकेतही केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व हल्ल्यांमुळे पंजाबमध्ये अनेक वेळा घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

FBI कडून दुजोरा

FBI चे संचालक काश पटेल यांनी एप्रिलमध्ये त्याच्या अटकेनंतर ट्विट करत म्हटले होते की, “हरप्रीत सिंग, जो अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत होता आणि भारत व अमेरिकेतील पोलीस ठाण्यांवर हल्ल्याच्या कटामध्ये सामील होता, त्याला अटक करण्यात आली आहे. न्याय नक्कीच मिळेल.”

NIA कडून मोठी कारवाई

भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने जानेवारी 2025 मध्ये त्याच्यावर 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. चंदीगढमधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर झालेल्या हातगोळा हल्ल्याच्या प्रकरणात तो प्रमुख आरोपी म्हणून घोषित करण्यात आला होता.

अमली पदार्थांची तस्करी ते दहशतवाद

हरप्रीत सिंग याने आपल्या सुरुवातीच्या काळात दारू आणि अमली पदार्थांची तस्करी करत आपला काळा धंदा सुरू केला. त्यानंतर तो पंजाबमधील प्रसिद्ध गुंड जग्गू भगवाणपुरिया याच्या संपर्कात आला. या काळात त्याने ग्रेनेड फेकण्याच्या तंत्रात विशेष कौशल्य मिळवले.

2018 मध्ये तो दुबईला गेला आणि तिथे पाकिस्तानी गुन्हेगारांशी संपर्कात आला. 2019 मध्ये भारतात परतल्यावर त्याने दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या. 2021 मध्ये ‘डंकी रूट’मार्गे तो अमेरिकेत पोहोचला आणि तिथेही भगवाणपुरियाच्या साथीदारांसोबत राहू लागला.

ISI आणि BKI शी संबंध

अमेरिकेत असताना त्याची भेट खलिस्तानी दहशतवादी हरिंदर सिंग रिंदा याच्याशी झाली. रिंदा मार्फत त्याचा संबंध बाबर खालसा इंटरनॅशनल आणि नंतर ISI शी जोडला गेला. या माध्यमातून त्याने आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा भाग बनून अनेक हल्ल्यांची आखणी केली.

भारत सरकारची तयारी

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आणि अमेरिकेतील भागीदार संस्थांनी परस्पर समन्वयाने ही कारवाई यशस्वी केली. लवकरच हरप्रीत सिंगला भारतात आणून त्याच्यावर NIA आणि अन्य एजन्सींकडून चौकशी केली जाणार आहे.

भारत सरकारसाठी ही मोठी यशस्वी कारवाई ठरली असून, पंजाबसह संपूर्ण देशातील सुरक्षिततेच्या दृष्टीने याला फार मोठे महत्त्व आहे. देशविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या आरोपींना कोणत्याही कोपऱ्यातून बाहेर काढून न्यायापर्यंत आणण्याची क्षमता भारत सरकारने पुन्हा सिद्ध केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT