मूळ भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  (source- The White House)
आंतरराष्ट्रीय

'अमेरिकेकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर...'; FBI डायरेक्टर बनताच काश पटेल यांचा इशारा

Kash Patel | जाणून घ्या कोण आहेत काश पटेल?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे विश्वासू सहकारी मूळ भारतीय वंशाचे काश पटेल (Kash Patel) यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल हे माजी राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी आहेत. ४४ वर्षीय पटेल यांच्या या सर्वात हायप्रोफाईल नियुक्तीला काही डेमोक्रॅट्सकडून तीव्र विरोध झाला. पण त्यांचा विरोध शेवटी निष्फळ ठरला. त्यांच्या संचालकपदी नियुक्तीला ५१ विरुद्ध ४९ मतांनी मंजुरी देण्यात आली. पटेल यांच्याविरोधात दोन रिपब्लिकन सिनेटर सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनी मतदान केले.

एफबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पटेल यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांचे अतूट विश्वास आणि पाठिंबा दर्शवल्याबद्दल आभार व्यक्त केले. “जी-मेन' पासून ते ९/११ च्या आत्मघातकी हल्ल्यानंतर आपल्या देशाचे रक्षण करण्यापर्यंत एफबीआयला एक ऐतिहासिक वारसा आहे. अमेरिकेच्या जनतेला पारदर्शक, जबाबदार आणि न्यायासाठी वचनबद्ध असलेल्या एफबीआयची गरज आहे. आपल्या "आपल्या न्यायव्यवस्थेच्या राजकारणीकरणामुळे जनतेचा विश्वास उडाला आहे. पण आज ते संपत आहे," असे काश पटेल यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

एफबीआयवरील विश्वास पुन्हा मिळवणे हे त्यांचे ध्येय असल्याचे पटेल यांनी सांगितले. त्यांनी अमेरिकन लोकांना अभिमान वाटेल अशा एजन्सीच्या पुनर्बांधणीसाठी काम करण्याचीही वचनबद्धताही व्यक्त केली आहे. “आणि जे अमेरिकन लोकांना हानी पोहोचवू पाहात आहेत त्यांना हा इशारा समजा की "आम्ही या पृथ्वी तलावावरील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुमचा शोध घेऊ," असेही त्यांनी म्हटले आहे. "मिशन फर्स्ट. अमेरिका ऑलवेज. चला कामाला लागू." असेही पुढे त्यांनी नमूद केले आहे.

ट्रम्प यांनी याआधी पटेल यांचा "अमेरिका फर्स्ट फायटर" असा उल्लेख केला होता. "आज आम्ही काश पटेल यांच्या एफबीआय संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली," असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी विविध पदांवर नियुक्त केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.

Who is Kash Patel : कोण आहेत काश पटेल?

कश्यप प्रमोद पटेल यांना अमेरिकेत काश पटेल या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९८० रोजी न्यूयॉर्कमधील पूर्व आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या गुजराती कुटुंबात झाला. त्यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रीय गुप्तचर संचालक तसेच संरक्षण विभागात महत्त्वाची पदे भूषवली. पटेल हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत सक्रिय राहिले. त्यांनी संरक्षण सचिव ख्रिस्तोफर मिलर यांचे चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केले. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या पटेल यांचे मूळ गुजरातमधील वडोदरा येथे आहे. त्यांनी रिचमंड विद्यापीठात पदवीपूर्व शिक्षण घेतले. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून आंतरराष्ट्रीय कायद्यातील प्रमाणपत्रासह कायद्याची पदवी मिळवली.

पटेल यांना सुरुवातीला मोठ्या लॉ फर्ममध्ये काम करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यामु‍ळे त्यांनी सरकारी वकील म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनी मियामी न्यायालयात जवळपास नऊ वर्षे खून, अमली पदार्थांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांसह गुंतागुंतीची अनेक प्रकरणे हाताळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT