वॉशिंग्टन डीसी : सुमारे 75 हजारांवर प्रेक्षक उपस्थित असलेल्या येथील मंगळवारच्या संध्याकाळच्या प्रचार सभेत आपल्या समारोपाच्या निवेदनात कमला हॅरिस यांनी अमेरिकेला आपण ऐक्य भावनेने एकत्र आणण्याची आणि मतभेद असणार्यांशीही संवाद साधण्याची ग्वाही दिली.
डोनाल्ड ट्रम्प देशात दुफळी निर्माण करून आपल्या विरोधकांवर सूड उगविण्याची भाषा करीत असले तरी आपण रिपब्लिकनासह सर्वांना एकत्र घेऊन देशाच्या इतिहासात नवा अध्याय सुरू करू इच्छीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्यांसाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नव्या पिढीचे नेतृत्व देण्यास वचनबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.
मागच्या बाजूला व्हाईट हाऊस असलेल्या इलिप्स पार्कमध्ये झालेल्या या सभेत हॅरिस यांनी या ठिकाणच्या 6 जानेवारी 2021 मधील ट्रम्प यांच्या चिथावणीखोर भाषणाची आठवण करून दिली. निवडणुकीचा निकाल अमान्य करीत आपल्या समर्थकांना याच ठिकाणच्या सभेत ट्रम्प यांनी चिथावणी देत या समुदायाकरवी कॅपिटल हिलवर हिंसक हल्ला घडवून आणला होता. त्यामुळेच हे ठिकाण हॅरिस यांनी आपल्या सभेसाठी निवडले असावे. त्या म्हणाल्या, आता 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीत मी किंवा ट्रम्प यांच्यापैकी एक व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफेसमध्ये विराजमान होणार आहे. समजा, ट्रम्प यांची निवड झाली तर ते पहिल्या दिवशी आपल्या विरोधक शत्रूंची यादी घेऊन जातील आणि मी देशासाठी प्राधान्याने काय करावयाचे आहे , त्याची यादी बरोबर नेणार आहे.
दरम्यान, आता शेवटच्या टप्प्यात दोन्हीही उमेदवार 7 स्विंग राज्यांवर आपले सर्व लक्ष केंद्रित करीत आहेत. हॅरिस या पेनसिल्वानिया, विस्कॉन्सिन, नॉर्थ कॅरोलिना येथील मतदारांपुढे तर ट्रम्प हेही नॉर्थ कॅरोलिना आणि ग्रीन बे, विस्कॉन्सिनमधील मतदारांपुढे जाणार आहेत.