पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला जेमतेम आठवडा उरला आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोन्ही उमेदवारांनी आपला निवडणूक प्रचार तीव्र केला असून एकमेकांवर शाब्दिक हल्ले वाढवले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एका निवेदनात म्हटले आहे की, ‘कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास त्या तिसरे महायुद्ध सुरू करू शकतात.’ (US President Election Kamala Harris vs Donald Trump)
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक प्रचार कार्यक्रमादरम्यान कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘जर कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर अमेरिका तिसऱ्या महायुद्धात अडकेल याची खात्री आहे. त्यांना जागतिक घडामोडींची काहीच माहिती नाही. त्यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी कसे बोलावे हे ज्ञान नाही.’
ट्रम्प म्हणाले की, ‘हॅरिस राष्ट्राध्यक्ष बनवणे म्हणजे देशातील लाखो लोकांच्या मुलांच्या जीवाशी जुगार खेळण्यासारखे आहे. महायुद्धाचा धोका आताच्यापेक्षा मोठा कधीच नव्हता. खरेतर मी राष्ट्राध्यक्षपदावर असतो तर इस्रायलवर 7 ऑक्टोबरला 2023 ला झालेला हल्ला झाला नसता.’
डेमोक्रॅटिक पक्षाने निवडणूक प्रचारात पूर्ण जोर लावला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढली. मिशिगनमध्ये शनिवारी (दि. 26) झालेल्या रॅलीत मिशेल ओबामा हॅरिस यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान त्यांनी ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनविणे हे अमेरिकेसाठी धोकादायक असल्याचा प्रचार केला. तसेच ट्रम्प यांचे मानसिक आरोग्य, त्यांचे सुरू असलेले अफेअर आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत मिशेल ओबामा यांनी समाचार घेतला.