पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त 'रॉयटर्स' या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यांना गंभीर स्वरूपाच्या कर्करोगाचे निदान झाले असून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांची प्रकृती हा चर्चेचा विषय होता. रॉयटर्स या वृतसंस्थेने रविवारी (दि.१८) त्यांच्या प्रकृतीबाबत वृताद्वारे खुलासा केला.
जो बायडन हे गेल्या काही दिवसांपासून मूत्रनलिकेच्या व्याधीने त्रस्त होते. शुक्रवारी (दि.१६) ते तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी त्यांना अनेक चाचण्या करण्यास सांगितल्या. या चाचण्यांचे निदान अहवाल समोर आले असून जो बायडेन यांना गंभीर स्वरूपाच्या प्रोस्टेट कर्करोगाने ग्रासल्याचे या रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. २०१५ साली जो बायडेन यांचा मोठा मुलगा ब्यू बायडेन याचा कर्करोगानेच मृत्यू झाला होता. त्याला ग्लायोब्लास्टोमा (Glioblastoma) नावाच्या मेंदूच्या अत्यंत धोकादायक कर्करोगाचे निदान झाले होते. त्यावेळी त्याचे वय ४६ वर्ष होते. त्यानंतर आता जो बायडन यांनाही प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. बायडेन कुटुंबीय पुढील उपचारासाठी कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
जो बायडेन हे ८२ वर्षांचे असून २०२१ ते २०२४ या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या शेवटच्या कार्यकाळात त्यांच्यावर सातत्याने वय आणि प्रकृती यावरून विरोधक टीका करत होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी त्यांनी माघार घेतली आणि त्यांच्याजागी कमला हॅरिस यांचा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अमेरिकेच्या जनतेने बायडेन यांना नाकारले आणि ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
प्रोस्टेट ग्रंथी ही अक्रोडच्या आकाराची लहान ग्रंथी असते. मूत्राशय आणि शिश्न याच्यामध्ये ही ग्रंथी असते. या ग्रंथीचा आकार वाढतो आणि मूत्रमार्ग बंद होतो. यातून लघवीच्या समस्या निर्माण होतात. वृध्द पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगचे प्रमाण सर्वाधिक असते. सतत लघवीला त्रास होणे , हातपायावर सूज येणे अशी या कर्करोगाची लक्षणे आहेत.