Ali Larijani killed file photo
आंतरराष्ट्रीय

Ali Larijani killed: मुलीच्या घरी पाहुणे म्हणून गेले होते अली लारीजानी; इस्रायलने इराणच्या 'चाणक्याला' कसं उडवलं?

Israeli airstrike Iran: इराणच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते अली लारीजानी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी इराणकडून करण्यात आली आहे.

मोहन कारंडे

Ali Larijani killed

तेहरान: इराणच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते अली लारीजानी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी इराणकडून करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. इराणमधील सर्वोच्च नेते अय्यातुल्ला अली खामनेई यांच्या हत्येनंतर मारले गेलेले ते सर्वात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

हा हल्ला तेहरानच्या ईशान्येला असलेल्या परदिस भागात झाला, जिथे लारीजानी त्यांच्या मुलीच्या घरी राहिले होते. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने आपले सचिव अली लारीजानी यांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिला आहे. या भीषण हल्ल्यात त्यांचा मुलगा मोर्तझा लारिजानी याचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे उपसचिव अलीरेजा बायात आणि अनेक अंगरक्षकही मारले गेले आहेत.

इराणच्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या निवासी भागात शिरून इस्रायलने हा 'सर्जिकल स्ट्राईक' केल्याने इराणच्या गुप्तचर यंत्रणेवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'इस्लामी गणराज्याचा सेवक शहीद'

सुरक्षा परिषदेने आपल्या निवेदनात लारिजानी यांचा उल्लेख 'इस्लामी गणराज्याचा आजीवन सेवक' असा केला आहे. "आज पहाटेच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात अली लारिजानी, त्यांचा मुलगा आणि सहकाऱ्यांसह शहीद झाले," असे इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. आयआरजीसीशी संबंधित वृत्तसंस्थांनीही या घटनेला दुजोरा दिला असून, हा हल्ला इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा थेट हल्ला असल्याचे मानले जात आहे.

इराणच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व

अली लारीजानी हे इराणच्या राजकारणातील सर्वात प्रभावी आणि अनुभवी नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांनी इराणच्या संसदाध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. ते इराणच्या अणुचर्चांमध्येही प्रमुख वाटाघाटी काम करणारे नेते होते. तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण ठरवण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी पूर्वी राष्ट्रीय प्रसारण संस्थेचे प्रमुख, सांस्कृतिक मंत्री तसेच सुरक्षा धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या पदांवरही काम केले होते. अनेक दशकांपासून ते इराणच्या सत्ताकेंद्रात महत्त्वाची भूमिका बजावत होते.

इस्रायलची आक्रमक प्रतिक्रिया

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी या कारवाईनंतर अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "खामेनी यांच्या 'दुष्टाईच्या अक्षातील' महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या लारीजानी यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे सर्व नेते आता नरकाच्या गर्तेत पोहोचले आहेत," असे विधान काट्झ यांनी केले आहे.

संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता

लारीजानी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT