Israel-Iran Conflict
जेरुसलेम : इराणमधील नागरिकांनी रेल्वे आणि रेल्वेमार्ग टाळावा, असा गंभीर इशारा इस्रायलने दिला आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असताना संभाव्य धोक्याचे संकेत दिले आहेत. इस्रायलने सोमवारी (दि. ६) रात्री उशिरा दिलेल्या एका इशाऱ्यामुळे पायाभूत सुविधांवर होणार्या हल्ल्यामुळे नवीन चिंता निर्माण झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या संरक्षण दलाने इराणमधील लोकांना रेल्वे आणि रेल्वेमार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे, तसेच त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा दिला आहे.आज सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर पर्शियन भाषेतील खात्यावरून जारी केलेल्या या इशाऱ्यात, नागरिकांना एका निश्चित कालावधीसाठी रेल्वे वाहतूक टाळण्यास सांगितले आहे.
“तुमच्या सुरक्षेसाठी, आम्ही नम्रपणे विनंती करतो की, या क्षणापासून इराण वेळेनुसार २१:०० वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजेपर्यंत) तुम्ही संपूर्ण इराणमध्ये रेल्वेचा वापर आणि प्रवास टाळावा. तुमची रेल्वेमध्ये आणि रेल्वेमार्गांजवळची उपस्थिती तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल, असेह इस्त्रायलच्या लष्कराने म्हटले आहे.
अमेरिका, इस्त्रायलने संयुक्तपणे २८ फेब्रवारी रोजी इराणवर हल्ला केला. तेव्हापासून दोन्ही बाजूंनी एकमेकांना धमक्या आणि लष्करी कारवाया केल्यामुळे परिस्थिती चिघळत चालली आहे. इस्त्रायलने रेल्वे प्रवासाबाबत केलेल्या सूचनेत कोणत्याही विशिष्ट प्रदेशाचा किंवा रेल्वे मार्गांचा उल्लेख नाही, त्यामुळे धोक्याच्या नेमक्या स्वरूपाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. या इशाऱ्यावर इराणने तात्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही.