Israel Politics Election Twist: इस्रायलच्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. आईसनकोट यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून राष्ट्रपती हर्जोग यांनी शनिवारी माजी लष्कर प्रमुख असलेल्या आईसेनकोट यांना सरकार बनवण्यासाठी पाचारण केलं आहे. आता त्यांच्यासमोर वेगवेगळ्या पक्षाना एकत्र घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. सरकार बनवण्यासाठी आइसेनकोट यांच्याकडे तीन पर्याय आहेत.
आइसेनकोट यांच्याकडे पहिला पर्याय म्हणजे बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत सत्ता स्थापन करणे. दुसरा पर्याय म्हणजे अरब पक्षांचा समर्थनाच्या जोरावर सत्ता स्थापन करणे. मात्र या पर्यायाला त्यांच्याच मित्र पक्षांकडून विरोध होत आहे. तिसरा पर्याय म्हणजे अती पारंपरिक यहुदी पक्षांसोबत जुळवून घेणे. हे समुदाय त्यांना लष्करी सेवेत सूट हवी अशी मागणी करतात.
माजी लष्कर प्रमुख आइसेनकोट आणि त्यांच्या मित्र पक्षांनी लष्करी सेवा हा सर्वात मोठा मुद्दा बनवला होता. अती पारंपरिक यहुदी पक्ष दीर्घ काळापासून त्यांना लष्करी सेवेतून सुट मिळावी अशी मागणी करत आहेत. या दलांसोबत हातमिळवणी करणं आइसेनकोट यांच्यासाठी सोपं नाही.
विद्यमान पंतप्रधान नेतन्याहू यांना यंदाच्या निवडणुकीत अरब पक्षांमुळे सत्तेपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे. त्यांचे म्हणणे आहे की अरब पक्षांनी आपल्या समर्थकांना मोठ्या संख्येने मतदान करायला लावले. नेतन्याहू यांनी केलेल्या दाव्याला काही ठोस आधार नाहीये.
नेतन्याहू यांनी शनिवारी आइसेनकोट यांच्यासोबत राष्ट्रीय एकतेचे सरकार स्थापन करण्याची अपील केली आहे. मात्र दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या नेतन्याहू आणि आइसेनकोट यांच्या आघाडी होणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. असे सरकार सहसा नाजूक गोष्टींवर अवलंबून असतात अन् ते सरकार कधीही पडू शकते. मात्र अरब पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी दोन कट्टर प्रतिस्पर्धी गळ्यात गळे घालून सत्ता स्थापन करू शकतात.
अरब नेतृत्व असलेल्या दोन पक्षांनी निवडणुकीत १९ जागा जिंकल्या आहेत. यातील एका पक्षाने आइसेनकोट यांना समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. दुसऱ्या पक्षाने देखील नेतन्याहू यांना सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र हे सोपे नाही कारण आइसेनकोट यांनी काही अटी ठेवल्या आहेत. इस्त्रायलला यहुदी देश म्हणून मान्यता देणे आणि पॅलेस्टिन संघटनांना हमासचे दहशवादी घोषित करणे यासारख्या काही अटींचा देखीस समावेश आहे. दुसरीकडे आइसेनकोट यांचा सहयोगी पक्षांनी यापूर्वीच अरब पक्षांसोबत युती करण्यास नकार दिला आहे.
आइसेनकोट यांनी रविवारी अधिकृतरित्या सरकार बनवण्यासाठी दनादेश दिला जाईल. त्यांच्याकडे युती करण्यासाठी २८ दिवस असणार आहे. राष्ट्रपती त्यांना दोन आठवड्यांचा देखील वेळ देऊ शकतील. जर आइसेनकोट सरकार बनवण्यात यशस्वी झाले नाही तर नेतन्याहू यांना संधी दिली जाईल. जर ते देखील सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले नाही तर काही महिन्यात पुन्हा देशात निवडणुका घेतल्या जातील. दरम्यान, इस्त्रायलची नवी संसद नेसेट सदस्य मंगळवारी सायंकाळी शपथ घेणार आहेत. तोपर्यंत नेतन्याहू यांचे कॅबिनेट मर्यादित अधिकारांसह सरकार चालवू शकतात.