Greta Thunberg Boat Diverted
इस्रायल : गाझा पट्टीकडे मदत घेऊन जाणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि इतर कार्यकर्त्यांची 'सेल्फी बोट' इस्रायली सैन्याने अडवून इस्रायलकडे वळवली. मॅडलीन नावाचे ब्रिटिश ध्वज असलेले हे जहाज पॅलेस्टिनी समर्थक फ्रीडम फ्लोटिला कोलिशन (एफएफसी) द्वारे आयोजित मोहिमेचा भाग होते. हे जहाज ६ जून रोजी सिसिलीहून निघाले होते.
इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे गाझाच्या नौदलाच्या नाकेबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्वीडिश हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग आणि युरोपियन संसदेच्या फ्रेंच सदस्या (एमईपी) रिमा हसन यांच्यासह आंतरराष्ट्रीय कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या मदत बोटीला अडवले. ६ जून रोजी सिसिलीहून निघालेले हे जहाज आज रात्री उशिरापर्यंत गाझा पट्टीत पोहोचणार होते. मात्र त्यापूर्वीच इस्रायली लष्कराने हे जहाज इस्रायलकडे वळवले.
फ्रीडम फ्लोटिला कोलिशनने इस्रायलवर मॅडलीन बोटीला जबरदस्तीने अडवल्याचा आणि त्यातील सदस्यांसोबत चुकीचे वर्तन केल्याचा आरोप केला आहे. मदत जहाजाला सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास अडवण्यात आले. बोट वळवल्यानंतर कार्यकर्त्यांना इस्रायली सैन्याने ओलीस ठेवले. अन्न आणि वैद्यकीय साहित्यासह जीवनावश्यक साहित्य जप्त केले, असे एफएफसीने म्हटले आहे. इस्रायलला मॅडलीनवरील आंतरराष्ट्रीय स्वयंसेवकांना ताब्यात घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे फ्रीडम फ्लोटिला कोलिशनच्या आयोजक हुवैदा अराफ यांनी म्हटले आहे.
इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "सेलिब्रिटींची “सेल्फी यॉट” सुरक्षितपणे इस्रायलच्या किनाऱ्यावर पोहोचत आहे. प्रवासी त्यांच्या मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे. ‘सेल्फी यॉट’मधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही हानी पोहोचलेली नाही. त्यांना सँडविच आणि पाणी देण्यात आले. शो संपला आहे.”
ग्रेटा थनबर्गचा जन्म २००३ मध्ये स्वीडिश राजधानी स्टॉकहोम येथे झाला. तिची आई मलेना एर्नमन एक ऑपेरा गायिका आहे आणि तिचे वडील स्वांते थनबर्ग एक अभिनेते आहेत. २०१८ मध्ये १५ वर्षांची असताना थनबर्गने स्वीडिश संसदेबाहेर पहिल्यांदा आंदोलन केले. शाळा सोडून ग्रेटाने स्वीडनच्या संसदेबाहेर आंदोलनाला सुरूवात केली. जगभरातील मोठ्या नेत्यांना लक्ष्य करत तिने पर्यावरणाविषयी ठोस पावले उचलण्यास भाग पाडले. वयाच्या आठव्या वर्षी जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाच्या परिवर्तनावर माहिती जाणून घेतली. या समस्येवर ग्रेटाला चिंता वाटू लागली. वयाच्या ११ व्या वर्षी ग्रेटाला मनोविकाराच्या आजाराने जडले. एस्परजर सिंड्रोमसारख्या आजाराला मोठ्या हिंमतीने ग्रेटाने हरवले आणि नव्या जोमाने पर्यावरणासाठी काम करण्यासाठी ती पुन्हा तयार झाली.