इस्रायलकडून इराणवर हल्‍ले सुरुच आहेत.  (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

Israel Iran War | इस्रायलचा इराणच्या अराक रिॲक्टरवर मोठा हल्ला, प्रत्युत्तरादाखल इराणनं केलं मुख्य रुग्णालयाला लक्ष्य

इस्रायल-इराण यांच्यात संघर्ष वाढला आहे

दीपक दि. भांदिगरे

Israel Iran War

इस्रायल-इराण यांचे सलग सातव्या दिवशी एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. दरम्यान, इस्रायलने इराणच्या अणू कार्यक्रमासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अराक हेवी वॉटर रिॲक्टरवर हल्ला केला आहे, असे वृत्त एपी वृत्तसंस्थेने गुरुवारी इराणच्या सरकारी टेलिव्हिजनच्या हवाल्याने दिले आहे.

यामुळे किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नसून या हल्ल्यापूर्वीच हे ठिकाण रिकामे करण्यात आले होते. इस्रायलने गुरुवारी सकाळी या ठिकाणावर हल्ला करणार असल्याचा इशारा देत तेथील लोकांना हे ठिकाण सोडून जाण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमधून हा इशारा दिला होता. त्यात हल्ल्यापूर्वीची प्लांटची सॅटेलाइट प्रतिमा दाखवण्यात आली होती.

इराणकडून इस्रायलच्या दक्षिणेकडील मुख्य रुग्णालयावर हल्ला

दरम्यान, इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील मुख्य रुग्णालयावर गुरुवारी क्षेपणास्त्राने हल्ला केला. यात रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोरोका मेडिकल सेंटरचे हे रुग्णालय आहे. ते इस्रायलच्या दक्षिणेकडील मुख्य रुग्णालय आहे.

बीर शेबा येथील सोरोका मेडिकल सेंटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात लोक जखमी झाले आहेत. तसेच रुग्णालयाकडून लोकांना उपचारांसाठी येऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, हे रुग्णालय सुमारे १,००० बेडचे आहे. ते इस्रायलच्या दक्षिणेकडील सुमारे १० लाख लोकांना आरोग्य सेवा पुरवते.

इस्रायलने इराणच्या अराक हेवी वॉटर रिॲक्टरवर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल हा हल्ला केला, असे इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने गुरुवारी म्हटले.

इस्रायली लष्कराने गुरुवारी तेहरान आणि इराणच्या इतर भागांत जोरदार हवाई हल्ले केले. त्यानंतर इराणने इस्रायलवर अनेक क्षेत्रणास्त्रे डागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT