Ayatollah Khamenei succession | खामेनींना हटविण्याचा ट्रम्प यांचा इशारा; इराणच्या नेतृत्वासाठी 'या' चार नावांची चर्चा
Ayatollah Khamenei succession
तेहरान / वॉशिंग्टन / तेल अवीव : इराणमधील सध्याची राजकीय स्थिती, इस्त्राईलशी सुरू असलेल्या संघर्षामुळे अधिकच अस्थिर झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक सत्तांतर किंवा पूर्णतः नवीन व्यवस्था अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवत आहेत. आयातोल्ला अली खामेनी यांच्यानंतर इराणचे नेतृत्व कोण करू शकेल, याची चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले ट्रम्प ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडामधील G7 परिषदेमधून अचानक एक्झिट घेतल्यानंतर केलेल्या विधानामुळे या चर्चा आणखी पेटल्या आहेत. ट्रम्प यांनी म्हटले, “आमच्याकडे खामेनी कुठे आहेत याची अचूक माहिती आहे. त्यांना हटवणे आमच्यासाठी अवघड नाही, पण सध्या आम्ही ते करत नाही – किमान आत्ता तरी नाही.”
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनीही खामेनी यांच्यावर थेट कारवाई केल्यास “मध्य पूर्वेची स्थिती पुन्हा महान होईल,” असे विधान करत, त्यांच्या हटविल्याने संघर्ष संपेल असा दावा केला.
मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei)
आयातोल्ला खामेनी यांचा दुसरा मुलगा मोजतबा खामेनेई यांच्याकडे IRGC (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) आणि कट्टरपंथीय गटांचे समर्थन आहे. अनेकांना वाटते की त्यांना पुढील सर्वोच्च नेते म्हणून तयार केले जात आहे. मात्र, वंशपरंपरागत नेतृत्व इराणच्या इस्लामिक क्रांतीच्या मूळ तत्वांना विरोध करते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरील दावे वादग्रस्त ठरू शकतात.
अलीरेझा आराफी (Alireza Arafi)
असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्सचे सदस्य, कुममधील मोठ्या धार्मिक संस्थेचे प्रमुख आराफी यांचे धार्मिक व राजकीय वर्तुळात खोल संबंध आहेत. कट्टर विचारसरणी, शासनाशी निष्ठा आणि धार्मिक प्रतिष्ठेमुळे ते खामेनी यांच्यानंतर सर्वोच्च नेते बनू शकतात.
आयातोल्ला हाशेम हुसेनी बुशहरी (Ayatollah Hashem Hosseini Bushehri)
असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्सचे उपाध्यक्ष कुममधील शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि शुक्रवारच्या नमाजांचे इमाम असलेल्या बुशहरी यांना खामेनेई यांचे समर्थन आहे. त्यामुळे तेही प्रभावशाली उत्तराधिकारी ठरू शकतात.
रेझा पहलवी (Reza Pahlavi)
जर इराणमध्ये केवळ नेतृत्व बदल न होता संपूर्ण शासनप्रणाली बदलली, तर clerical किंवा सत्ताधारी गटाच्या बाहेरूनही काही व्यक्ती नेतृत्वासाठी पुढे येऊ शकतात.
इराणचे माजी सम्राट शाह पहलवी यांचे चिरंजीव रेझा पहलवी सध्या अमेरिका येथे वास्तव्यास आहेत. ते राजशाही परत आणण्याचा आग्रह करत नाहीत, पण लोकशाही व मानवाधिकारांसाठी प्रचार करत आहेत.
देशाबाहेरील इराणी नागरिकांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा आहे. मात्र, देशातील लोकांमध्ये त्यांचा प्रभाव पुरेसा नाही. सत्तांतर झाल्यास, संक्रमण सरकारसाठी ते एक प्रतीकात्मक नेता ठरू शकतात.
रेझा पहलवी यांनी एका पोस्टमध्ये दावा केला की, "खामेनी आता भूमिगत गेले असून त्यांनी देशाचे नियंत्रण गमावले आहे. त्यांनी इराणी जनतेला इराण परत मिळवण्यासाठी उठाव करण्याचे आवाहन केले आहे.

