इराकचे पंतप्रधान ( Iraqi PM ) मुस्तफा अल-कादिमी यांच्या निवासस्थानावर आज ( दि.७ ) सकाळी ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यातून पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी थोडक्यात बचावले आहेत. हा पंतप्रधानाच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे इराकच्या लष्कराने म्हटले आहे. या हल्यात काही जण जखमी झाल्याचे स्थानिक वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
रविवारी सकाळी स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सात सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर तत्काळ ट्विट करत अल-कादिमी यांनी स्पष्ट केले की, अशाहल्ल्यांनी सुरक्षा दलांची दृढता आणि संकल्प याला धक्का पोहचणार नाही. मी सुरक्षित आहे.
इराक सरकारने म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ( Iraqi PM ) हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. पंतप्रधान सुरक्षित आहेत. शहरातील ग्रीन झोनमध्ये स्फोट झाल्यानंतर गोळीबार झाल्याचा आवाज आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या परिसरात परराष्ट्र सेवेची कार्यालय आणि सरकारी कार्यालय आहेत. हल्ल्यानंतर काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
इराकमध्ये १० ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली. या निवडणूक निकालाविरोधात ग्रीन झोनबाहेर शिया मिलिशिया समर्थकांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी सुरक्षा दलाचे जवान आणि शिया मिलिशियामध्ये गोळीबार झाला. यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला. तर अनेक जवान जखमी झाले होते. यानंतर या परिसरातील तणाव वाढला होता. इराकमध्ये झालेल्या निवडणुकीचे संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदाने प्रशंसा केली होती.