Israel Iran war : इस्रायलसोबत १२ दिवस चाललेल्या युद्धादरम्यान इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान हे इस्रायली हल्ल्यात जखमी झाले होते, अशी माहिती इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कोअरशी (IRGC) संलग्न असलेल्या 'फार्स न्यूज एजन्सी'ने आज (दि. १३) दिली.
१६ जून रोजी इराणची राजधानी तेहरानवर झालेल्या इस्रायली हल्ल्यात राष्ट्रपती पेझेश्कियान जखमी झाले होते. राष्ट्रपती पेझेश्कियान तेहरानमध्ये वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात बैठकीत सहभागी झालेले अनेक जण जखमी झाले होते.'फार्स न्यूज एजन्सी'च्या वृत्तानुसार, या हल्ल्यामुळे पेझेश्कियान यांच्या पायाला दुखापत झाली. युद्ध सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी, १६ जून रोजी, तेहरानच्या पश्चिम भागातील एका इमारतीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या या बैठकीत इराणचे राष्ट्रपती, संसदेचे अध्यक्ष आणि न्यायपालिकेचे प्रमुख सहभागी झाले होते.
इस्रायलने राबवलेले ऑपरेशन हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह याच्या हत्येसारखेच होते, असे या वृत्तात म्हटले आहे. इस्रायलने लेबनॉनमधील इराण-समर्थित दहशतवादी गट हिजबुल्लाहचा तत्कालीन प्रमुख हसन नसरल्लाह याची बेरूत येथील मुख्यालयात हत्या केली होती. हसन नसरल्लाह हे गटाच्या वरिष्ठ कमांडरसोबत भूमिगत मुख्यालयात बैठक घेत असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले होते.
इस्रायलने १२ जून रोजी इराणवर हल्ला केला होता. १२ दिवस चाललेल्या या युद्धात इस्रायलने इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे सर्वोच्च नेतृत्व, वरिष्ठ कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना ठार केले होते. १३ जून रोजी इराणवरील सुरुवातीच्या हल्ल्यातच इस्रायलने IRGC चे कमांडर मेजर जनरल होसेन सलामी आणि इराणी सशस्त्र दलाचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांना ठार केले होते. IDF ने IRGC वायुसेनेचे कमांडर अमीर अली हाजिजादेह आणि इतर वरिष्ठ इराणी वायुसेना अधिकाऱ्यांच्या हत्येचीही पुष्टी केली होती.