Donald Trump Iran deal
वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या युद्धविराम काळानंतर, आता दोन्ही देशांमध्ये तणाव निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका आता इराणसोबत मिळून काम करेल. इराणमध्ये युरेनियमची समृद्धी होणार नाही, याची खात्री केली जाईल. त्याबदल्यात इराणवरील आयात शुल्क (Tariff) व आर्थिक निर्बंधांमध्ये सवलत देण्याबाबत चर्चा केली जाईल, अशी मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. ८) केली.
सोशल मीडियावरील फ्लॅटफॉर्म ट्रूथवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे जे युरेनियम जमिनीखाली गाडले गेले होते, ते बाहेर काढून नष्ट करण्यासाठी अमेरिका इराणला मदत करेल.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अमेरिका आता इराणसोबत काम करेल. इराणमध्ये एक अत्यंत फलदायी 'राजवट बदल' झाला आहे, हे आम्ही निश्चित केले आहे. तिथे युरेनियम समृद्धी होणार नाही. अमेरिका इराणसोबत मिळून बी-२ बॉम्बर्सच्या साह्याने जमिनीत खोलवर गाडले गेलेले सर्व आण्विक 'धूलिकण' बाहेर काढून नष्ट करेल, असा दावाही त्यांनी केला.
यापूर्वीही ट्रम्प यांनी संकेत दिले होते की, इराणशी करार झाला, तर जमिनीखाली गाडलेले हे आण्विक साहित्य बाहेर काढण्याची कठीण मोहीम अमेरिका हाती घेईल. या प्रक्रियेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, "आम्ही इराणसोबत आयात शुल्क आणि निर्बंधांत सवलत देण्याबाबत चर्चा करत आहोत आणि पुढेही ती सुरू राहील. प्रस्तावित १५ मुद्द्यांपैकी अनेकांवर आधीच एकमत झाले आहे."