iran unrest impact on india airspace closure flights advisory trade-impact students crisis
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
इराणमध्ये सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या शासनाविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांमुळे भारतातही तणाव वाढला आहे. इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांनी त्या परिसरातून जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलले आहेत. इराणमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या हजारो काश्मिरी विद्यार्थ्यांचे पालक आता भारत सरकारकडे मदतीची विनंती करत आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशातील अंतर्गत परिस्थिती अत्यंत अस्थिर झाली आहे. दररोज परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. 28 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या आंदोलनांमध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते मृतांची संख्या 2,000 पेक्षा अधिक असून काही अहवालांनुसार ही संख्या 3,000 च्या पुढे गेली आहे.
या संकटाचा थेट परिणाम भारतावरही झाला आहे. बुधवारी इराणने अचानक आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे भारत, युरोप आणि उत्तर अमेरिकेदरम्यानच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या विमान कंपन्यांना उड्डाणांचे मार्ग बदलावे लागले असून अनेक फ्लाइट्स रद्दही करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दोन्ही विमान कंपन्यांनी याबाबत प्रवाशांसाठी अधिकृत सूचना (अॅडव्हायझरी) जारी केली आहे.
काश्मिरी विद्यार्थ्यांसह 10 हजार भारतीय अडचणीत
सध्या इराणमध्ये सुमारे 10,000 ते 12,000 भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत. त्यापैकी सुमारे 2,000 ते 3,000 काश्मिरी विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
जम्मू-कश्मीर स्टुडंट्स असोसिएशन (JKSA) ने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वारंवार इंटरनेट सेवा बंद होत असल्याने आणि हिंसक आंदोलनांमुळे विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली आहे.
भारतीय दूतावासाने इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, अद्याप कोणतीही अधिकृत स्थलांतर (इव्हॅक्युएशन) योजना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे पालक भारत सरकारकडे त्यांच्या मुलांना सुरक्षितरीत्या परत आणण्यासाठी मदतीची मागणी करत आहेत.
व्यापारावरही परिणाम
या अस्थिरतेचा परिणाम भारत-इराण व्यापारावरही दिसून येत आहे. आधीच अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारत-इराण व्यापारात मोठी घट झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत शिपिंग मार्ग आणि तेलपुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्याचा भारताच्या व्यापार तुटीवर (Trade Deficit) अधिक दबाव पडू शकतो.
आकडेवारीनुसार, 2019 मध्ये भारत आणि इराणमधील व्यापार सुमारे 17.6 अब्ज डॉलर इतका होता. मात्र 2024 मध्ये तो घटून केवळ 2.3 अब्ज डॉलरपर्यंत आला आहे. भारताच्या एकूण व्यापारापैकी केवळ 0.2 टक्के व्यापार ईराणसोबत होतो, तरीही शिपिंग मार्गांवर परिणाम झाल्यास त्याचे अप्रत्यक्ष परिणाम जाणवू शकतात.
चाबहार बंदर प्रकल्प धोक्यात
भारतासाठी सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला चाबहार बंदर प्रकल्पही धोक्यात आला आहे. या प्रकल्पात भारताने सुमारे 500 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि युरोपपर्यंत पोहोचण्यासाठी चाबहार बंदर भारतासाठी महत्त्वाचा दुवा आहे. मात्र इराणमधील सध्याची राजकीय व आर्थिक अस्थिरता या प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
बासमती तांदळाच्या निर्यातीला मोठा फटका
भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीवरही या संकटाचा मोठा परिणाम झाला आहे. ईराण हा भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा परदेशी बाजार होता. 2018-19 मध्ये भारताने ईराणला सुमारे 3.51 अब्ज डॉलरचा निर्यात व्यापार केला होता. मात्र 2024-25 मध्ये हा आकडा घटून केवळ 1.24 अब्ज डॉलरपर्यंत आला आहे. याचा थेट फटका भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांना बसत आहे.
पश्चिम आशियातील बदलती आणि अनिश्चित राजकीय परिस्थिती भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी मोठे आव्हान ठरत आहे. ईराण, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यात संतुलन राखण्याचा भारताचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, जेणेकरून प्रादेशिक स्थिरता कायम राहू शकेल.