

तेहरान; वृत्तसंस्था : इराणमधील सत्ताधारी राजवटीविरोधात सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर जलद गतीने खटले चालवून त्यांना फाशी देण्याचे संकेत इराणच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी दिले आहेत. दुसरीकडे, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी बुधवारी माहिती दिली की, मृतांचा आकडा गेल्या अनेक दशकांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला असून आतापर्यंत किमान 2,572 लोक मारले गेले आहेत.
इराणचे न्यायपालिका प्रमुख गुलाम हुसेन मोहसेनी-एजेई यांनी मंगळवारी एका व्हिडीओद्वारे हे भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फाशी दिल्यास अमेरिका अत्यंत कठोर कारवाई करेल’ असा इशारा देऊनही इराणने आपली भूमिका कायम ठेवली आहे. ह्युमन राईटस् अॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळपर्यंत मृतांची संख्या 2,571 झाली होती. हा आकडा गेल्या अनेक दशकांतील कोणत्याही उठावापेक्षा जास्त असून 1979 च्या इस्लामिक क्रांतीदरम्यानच्या अराजकतेची आठवण करून देणारा आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणच्या नेत्यांना इशारा दिला आहे की, ते आता कोणतीही चर्चा करणार नाहीत आणि परिस्थितीनुसार कठोर पावले उचलतील.
इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 2,500 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. या बिघडत्या परिस्थितीची गंभीर दखल घेत भारत सरकारने इराणमध्ये राहणार्या आपल्या नागरिकांना त्वरित देश सोडण्याचे आवाहन केले आहे.