Iran UAE Tanker Attack Pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran UAE Attack: इराणचा होर्मुझ सामुद्रधुनीत UAE च्या तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू, आठ जण जखमी

Iran UAE Tanker Attack: इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत UAE च्या दोन तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर सहा भारतीयांसह आठ जण जखमी झाले.

पुढारी वृत्तसेवा

Iran UAE Tanker Attack: अमेरिका इराण संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना होर्मुझ सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) मोठी घटना घडली आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून सहा भारतीयांसह एकूण आठ जण जखमी झाले आहेत.

UAE च्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'मोम्बासा' आणि 'अल बहियाह' या दोन तेलवाहू जहाजांवर दोन इराणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोन्ही जहाजांना आग लागली आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, बचाव पथकांनी आग नियंत्रणात आणली आहे. जखमी झालेल्यांमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संयुक्त अरब अमिरातीने इराणच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. UAE च्या परराष्ट्र मंत्रालयाने हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले असून, देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मृत भारतीय खलाशाच्या कुटुंबीयांप्रती तसेच भारत सरकार आणि भारतीय जनतेप्रती संवेदना व्यक्त करत जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची मागणी

UAE ने इराणवर होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर आर्थिक दबावाचे आणि ब्लॅकमेलचे साधन म्हणून केल्याचा आरोप केला आहे. व्यापारी जहाजांवर हल्ले करणे हे समुद्री दरोडेखोरीसारखे असून त्यामुळे प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे UAE ने म्हटले आहे.

यासोबतच इराणने तातडीने सर्व हल्ले थांबवावेत, युद्धजन्य कारवाया बंद कराव्यात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत सुरू राहण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे खुली करावी, अशी मागणीही UAE ने केली आहे.

अमेरिका इराण संघर्ष आणखी चिघळला

या हल्ल्यापूर्वी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेने याशिवाय इराणच्या बंदरांकडे जाणाऱ्या आणि तेथून बाहेर पडणाऱ्या जहाजांवर नौदलाकडून नाकेबंदी पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, इतर देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

दरम्यान, अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची स्थिती अत्यंत कमकुवत झाली असून ते "90 टक्के संपले आहेत," असा दावा ट्रम्प यांनी केला. याशिवाय इराणचे नौदल, हवाई दल आणि हवाई संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली असून त्यांच्या अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला आहे.

दरम्यान, आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे जागतिक तेलपुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढली असून, परिस्थितीवर जगभरातील देशांचे बारकाईने लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT