PM Modi Pudhari
आंतरराष्ट्रीय

PM Modi: युएईवरील इराणचा हल्ला अमानवीय; तीन भारतीय जखमी झाल्याने PM मोदींनी केला तीव्र निषेध

संयुक्त अरब अमिरातीमधील फुजैरा येथे इराणने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तीव्र शब्दांत निषेध केला.

पुढारी वृत्तसेवा

Iran UAE attack PM Narendra Modi reaction

नवी दिल्ली: संयुक्त अरब अमिरातीमधील फुजैरा येथे इराणने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तीव्र शब्दांत निषेध केला. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले असून, नागरी वस्त्या आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वर लिहिले आहे की, "युएईवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात आमचे तीन भारतीय बांधव जखमी झाले आहेत. निष्पाप नागरिक आणि नागरी सुविधांवर असे हल्ले होणे सहन केले जाणार नाही. भारत या कठीण काळात युएईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे." पश्चिम आशियातील तणाव निवळण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जागतिक वाहतूक विनाअडथळा सुरू राहणे आवश्यक असल्याचे सांगत मोदी पुढे म्हणाले की, "प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी या समुद्री मार्गाची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे."

परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले आहे?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही या हल्ल्याबाबत कडक भूमिका घेतली आहे. प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, फुजैरा येथील तेल सुविधेवर झालेला हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारा आहे. त्यांनी तात्काळ हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, युएईमधील भारतीय दूतावास जखमी भारतीयांच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरवली जात असल्याची सांगितले.

होर्मुझमध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला

इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या अमेरिकन युद्धनौकेवर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात जहाजाचे नुकसान झाले आणि ते मागे हटले, असा दावा करण्यात आला. इराणी नौदलाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा हल्ला केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, अमेरिकन सेंट्रल कमांडने हा दावा पुर्णतः नाकारला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, होर्मुझमध्ये अमेरिकेच्या कोणत्याही जहाजावर हल्ला झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT