पाकिस्तानमधील काराची शहरात इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिया संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
US Embassy attack Karachi
कराची : अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतौल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. या वृत्तानंतर पाकिस्तानमधील कराची शहरात संतापाची लाट उसळली आहे. आज (दि. १) अमेरिकन दूतावासावर आंदोलकांनी दगडफेक आणि लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला.स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकन दूतावासाच्या सुरक्षा रक्षकांनी (US Marines) केलेल्या गोळीबारात किमान १० पाकिस्तानी आंदोलकांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. आयातुल्ला खामेनी यांच्या समर्थनार्थ निघालेल्या जमावाने दूतावासावर च केली असता ही चकमक उडाली.
इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिया संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. बचाव पथकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत किमान ५ जण जखमी झाले आहेत.
सुलतानाबाद येथून निघालेला आंदोलकांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या अमेरिकन दूतावासात घुसण्याचा प्रयत्न केला. जमावाने दगडफेक सुरू केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना या भागातून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.
गोळीबारात १० आंदोलकांचा मृत्यू
दंगलीस सुरुवात होताच दूतावासातील अमेरिकन मरीन सुरक्षा दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. 'समा टीव्ही' या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या दाव्यानुसार, दूतावासाच्या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात १० हून अधिक लोक ठार झाले असून ३० हून अधिक जखमी झाले आहेत.
कराचीतील विविध मशिदी आणि इमामवाड्यांमध्ये खमेनी यांच्या निधनाचा शोक व्यक्त करण्यासाठी नागरिक जमा झाले. इराणने या मृत्यूसाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरल्यामुळे आंदोलकांनी अमेरिकेसह इस्त्रायलविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इतर परदेशी दूतावासांनाही धोका निर्माण होऊ नये म्हणून शहरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.