US report Iran war
वॉशिंग्टन: इराणसोबतच्या युद्धात मध्य पूर्वेतील आठ देशांमधील अमेरिकी लष्करी तळ आणि दुतावासांचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाच्या (पेंटागॉन) इन्स्पेक्टर जनरलच्या एका विशेष अहवालात या नुकसानीची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
२८ फेब्रुवारी ते ३० जून या कालावधीचा आढावा घेणाऱ्या या अहवालानुसार, इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये कुवेत, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इराक, ओमान आणि जॉर्डन येथील शेकडो अमेरिकी इमारतींचे नुकसान झाले आहे.
इराणी सैन्य आणि त्यांच्या समर्थित गटांनी अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केल्यामुळे 'यूएस सेंट्रल कमांड'ला आपले कर्मचारी, लष्करी साहित्य आणि गोदामे सुरक्षित ठिकाणी हलवावी लागली. इराक आणि कुवेत येथून लष्करी वैद्यकीय हेलिकॉप्टर्स मागे घेण्यात आली, तसेच बहुतांश जखमी सैनिकांना रस्तेमार्गाने स्थानिक रुग्णालयांत उपचारासाठी नेण्यात आले.
बहरीन येथील अमेरिकन नौदलाच्या महत्त्वाच्या तळाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे, पुरेसे नौदल तळ आणि सहाय्यक बंदरे उभारण्यात मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, असे अहवालात म्हटले आहे. नौदलाचे प्रभारी सचिव हंग काओ यांनी सांगितले की, इराणच्या हल्ल्यात हा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे अमेरिकेला हिंदी महासागरातील 'डिगो गार्सिया' बेटाचा वापर रसद पुरवठ्यासाठी करावा लागत असून, सैन्याला रसद पोहोचण्यास आता १४ ते १८ दिवसांचा कालावधी लागत आहे. तसेच, पुरवठ्यातील तुटवडा आणि टपाल यंत्रणा विस्कळीत झाल्याने पर्शियन आखातात तैनात अमेरिकन सैनिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
परराष्ट्र विभाग आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या महानिरीक्षक कार्यालयांच्या सहकार्याने तयार केलेल्या या अहवालानुसार, इराणी हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या राजनैतिक सुविधांचे सुमारे १८४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात अमेरिकेच्या लष्करी तळांच्या नुकसानीचा अंदाज देण्यात आलेला नाही.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला, दोन इराणी ड्रोन्सनी रियाधमधील अमेरिकन दूतावास परिसरावर हल्ला केला, ज्यामुळे सीआयएच्या एका केंद्रासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एका ड्रोनने दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासालाही लक्ष्य केले, ज्यामुळे एका युटिलिटी बिल्डिंगचे नुकसान झाले. कुवेतमधील अमेरिकन दूतावासावर इराणी ड्रोनने हल्ला झाल्यानंतर मार्चमध्ये तेथील कामकाज स्थगित करण्यात आले होते आणि जूनच्या उत्तरार्धात तेथील अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मे महिन्यात परराष्ट्र विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील अमेरिकन आस्थापनांवर ६०० हून अधिक हल्ले झाल्याची नोंद झाली होती. या हल्ल्यांमुळे सुमारे १५७ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले.
युद्धामुळे निर्माण झालेल्या धोक्यामुळे बहरीन, इराक, जॉर्डन, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई मधील बिगर-आपत्कालीन कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. या काळात सुमारे ३,५०० राजनैतिक अधिकारी व कर्मचारी या भागातून बाहेर पडले. सध्या बहुतांश दूतावासांचे कामकाज मर्यादित स्वरूपात सुरू आहे. युद्ध संपल्यानंतर मध्य पूर्वेतील अमेरिकी लष्करी तळ आणि कर्मचाऱ्यांची संख्या कायमस्वरूपी कमी करायची का, यावर आता अमेरिकेचे संरक्षण आणि गुप्तचर अधिकारी विचार करत आहेत.