Iran Strait of Hormuz control :  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran Strait of Hormuz control : पुढील ३० दिवस 'हॉर्मुझ सामुद्रधुनी' नियंत्रित ठेवणार; इराणच्‍या परराष्‍ट्र मंत्र्यांचा इशारा

हॉर्मुझ सामुद्रधुनीवर केवळ इराणचेच नियंत्रण असल्‍याचा पुन्‍नरुच्‍चार

पुढारी वृत्तसेवा

Iran Strait of Hormuz control : 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' (हॉर्मुझची सामुद्रधुनी) पुढील ३० दिवस पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली राहील. कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा एकतर्फी कारवाई केल्यास ही सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास उशीर होईल, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज (दि.२८) दिला.

सर्व अडथळे दूर केल्‍यानंतर हॉर्मुझची पूर्ण क्षमता पूर्ववत केली जाईल

बगदाद येथे इराकी परराष्ट्र मंत्र्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अराघची म्हणाले, "हॉर्मुझची सामुद्रधुनी पुढील ३० दिवस पूर्णपणे इराणच्या देखरेखीखाली आणि व्यवस्थापनाखाली राहील. सर्व अडथळे दूर झाल्यानंतर या जलमार्गाची पूर्ण क्षमता पूर्ववत केली जाईल."

हॉर्मुझ सामुद्रधुनीला आव्हान दिल्यास 'तणाव वाढेल'

धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणच्या नियंत्रणाला आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास तणाव आणखी वाढेल. मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी हा इशारा दिला आहे. "इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणकडून सध्या सुरू असलेल्या व्यवस्थेव्यतिरिक्त नवीन किंवा वेगळी व्यवस्था लागू करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल. तसेच हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास उशीर होईल आणि गेल्या दोन रात्री आपण पाहिले आहे त्याप्रमाणे तणाव आणखी वाढेल." असेही ते म्‍हणाले.

इस्रायलला लेबनॉनवरील हल्ले थांबवण्यास सांगा

इस्रायलवर दबाव आणून लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत. इराण आणि अमेरिकादरम्यान झालेल्या सामंजस्य करारातील (MoU) लेबनॉनशी संबंधित कलमांसह सर्व अटींचे पालन केले गेले पाहिजे. दुर्दैवाने इस्रायल लेबनॉनवर हवाई हल्ले करतच आहे. अशावेळी अमेरिकेने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे" आणि इस्रायलला हल्ले थांबवण्यास तसेच लेबनॉनमधील व्याप्त भागातून माघार घेण्यास भाग पाडले पाहिजे, असे आवाहनही इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केले.

खाडी देशांसोबत 'सुरक्षा फ्रेमवर्क' तयार करण्याचे इराणचे आवाहन

अराघची यांनी खाडी देशांचा समावेश असलेल्या एका प्रादेशिक सुरक्षा फ्रेमवर्क (सुरक्षा यंत्रणा) स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. ते म्‍हणाले, "आपण अशा एका नवीन फ्रेमवर्कवर पोहोचले पाहिजे ज्यामध्ये या क्षेत्रातील सर्व देशांचा समावेश असेल आणि या क्षेत्राबाहेरील कोणत्याही देशाची उपस्थिती किंवा हस्तक्षेप नसेल."

जॉर्डनने केला इराणी हल्ल्यांचा तीव्र निषेध

जॉर्डनने आज बहरीन आणि कुवेतला लक्ष्य करून इराणने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. हे हल्ले या दोन्ही देशांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असून त्यांच्या सुरक्षा आणि स्थिरतेला धोका निर्माण करणारे आहेत, असे जॉर्डनने म्हटले आहे. जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अम्मान (जॉर्डनची राजधानी) बहरीन आणि कुवेतसोबत पूर्णपणे पाठीशी उभा आहे. तसेच आपले सार्वभौमत्व, सुरक्षा आणि जनतेच्या रक्षणासाठी या देशांनी उचललेल्या कोणत्याही पावलाला जॉर्डनचा पाठिंबा असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT