आंतरराष्ट्रीय

Iran threat Trump : 'ट्रम्प यांच्या मुलाला कुठे मारायचे... ९६ कोटींचे बक्षीस'; इराणच्या सरकारी टीव्हीवरील व्हिडिओमुळे खळबळ

इराणी सरकारी टेलिव्हिजनच्या 'चॅनेल ३' वर प्रसारित आणि आयआरजीसी (IRGC) शी संबंधित मीडियाने जारी केला व्‍हिडिओ

पुढारी वृत्तसेवा

Iran threat Barron Trump : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अमेरिकन हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर आता नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्धार केला असून, अमेरिकेविरुद्ध कठोर पावले उचलली जात आहेत. याच दरम्यान इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओने अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांची झोप उडवली आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने थेट अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाला लक्ष्य करत, त्यांचे सुपुत्र बॅरन ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचे मार्ग दाखवणारा एक भाग प्रसारित केला आहे. इतकेच नव्हे तर बॅरन यांच्यावर हल्ला करणाऱ्यासाठी १० दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे ९६ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे.

व्हिडिओमध्ये बॅरन यांच्‍या दैनंदिन हालचालीवर लक्ष

इराणी सरकारी टेलिव्हिजनच्या 'चॅनेल ३' वर प्रसारित आणि आयआरजीसी (IRGC) शी संबंधित मीडियाने जारी केलेल्या या व्हिडिओचे शीर्षक 'बॅरन ट्रम्प यांना कुठे मारायचे' असे आहे. या व्हिडिओमध्ये २० वर्षीय बॅरन यांच्या दैनंदिन हालचाली आणि सुरक्षेतील त्रुटींचे चित्रीकरण दाखवण्यात आले आहे. बॅरन यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवले जात असल्याचा दावा करत, एका मुलीने सुरक्षेला चकमा देऊन एका खाजगी बैठकीत त्यांच्या शेजारी जागा मिळवल्याचेही म्‍हटलं आहे. बॅरन सुरक्षेपासून दूर राहून 'एक्सबॉक्स'वर व्हॉईस व टेक्स्टद्वारे संवाद साधतात, असे सांगत त्यांच्या एक्सबॉक्स, फिफा व्हिडिओ गेम आणि डिस्कॉर्ड खात्यांचा उल्लेख या व्हिडिओत करण्यात आला आहे.

मेलानिया ट्रम्पसुद्धा इराणच्या निशाण्यावर

मागील महिन्यातही इराणच्या सरकारी टीव्हीने एक व्हिडिओ जारी केला होता. यामध्ये अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्या व्हिडिओच्या शेवटी बॅरन यांच्याकडे लक्ष वेधत "ही तर फक्त सुरुवात आहे, बॅरन ट्रम्प आमची वाट पाहा," अशी थेट धमकी देण्यात आली होती. 'मेलानिया यांना कुठे मारायचे' या व्हिडिओमध्ये मेलानिया यांचा ताफा आणि त्या भेट देत असलेल्या न्यूयॉर्कमधील विविध ठिकाणांचे चित्रीकरण होते. त्या खरेदी करत असलेल्या लक्झरी डिझायनर स्टोअर्सची माहिती देत, त्यांच्या कपड्यांमध्ये 'नर्व्ह एजंट' (विष) मिसळण्याचा प्रस्तावही या व्हिडिओतून मांडण्यात आला होता.

सीक्रेट सर्व्हिसचे कडक सुरक्षा कवच

मेलानिया आणि बॅरन या दोघांनाही अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसचे २४ तास कडक सुरक्षा कवच आहे. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या अहवालानुसार, व्हाईट हाऊस, न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवर, न्यू जर्सीचे बेडमिंस्टर गोल्फ क्लब आणि फ्लोरिडातील मार-ए-लागो या सर्व ठिकाणांची सुरक्षा अत्यंत कडक करण्यात आली आहे.

... ही तर अमेरिकेची पराभवाचीच कबुली : इराण

दरम्यान, ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत इराणची अर्थव्यवस्था कोसळत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे वित्त सचिव स्कॉट बेसेंट यांनी तेहरानविरुद्ध 'आर्थिक डी-डे' सुरू झाल्याची घोषणा केली असून, इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर जागतिक बहिष्कार टाकला जाईल असा इशारा दिला आहे. यावर प्रत्युत्तर देताना इराणने, अमेरिकेची ही पावले म्हणजे त्यांच्या लष्करी पराभवाची कबुली असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT