आंतरराष्ट्रीय

Iran Qatar LNG attack | जगाचा 'गॅस पुरवठा' धोक्यात? इराणचा कतारवर क्षेपणास्त्र हल्ला; सर्वात मोठा LNG प्रकल्प आगीच्या विळख्यात

जगातील एकूण एलएनजी पुरवठ्यापैकी सुमारे २०% पुरवठा रास लाफान प्रकल्पातून

पुढारी वृत्तसेवा

Iran Qatar LNG attack

दोहा : खाडी देशांमधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. इराणने कतारमधील जगातील सर्वात मोठ्या लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) निर्यात प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात मोठी आग लागली आहे, असे वृत्त 'अल जझीरा'ने दिले आहे.

इराणने डागले रास लाफान शहरावर क्षेपणास्त्र

इराणने बुधवारी रात्री उशिरा कतारच्या रास लाफान या औद्योगिक शहरावर क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यामुळे प्रकल्पात भीषण आग लागली. कतारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने, या प्रकल्पातून कर्मचाऱ्यांना आधीच सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इराणने याआधीच इशारा दिला होता की, इस्रायलने इराणच्या 'साउथ पार्स' गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमधील ऊर्जा केंद्रे आमचे टार्गेट असेल.

जागतिक बाजारपेठेवर संकट

रास लाफान प्रकल्प हा जगातील एकूण एलएनजी पुरवठ्यापैकी सुमारे २०% वाटा उचलतो. या हल्ल्यामुळे नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वुड मॅकेन्झी (Wood Mackenzie) या सल्लागार संस्थेचे संचालक टॉम मारझेक-मॅन्सर यांनी म्हटले की, "रास लाफानवरील हल्ला ही जागतिक बाजारपेठेसाठी सर्वात भीतीदायक गोष्ट आहे."

देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला : कतार

या घटनेनंतर कतारने इराणच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. प्रत्युत्तर म्हणून कतारने इराणच्या लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्‍यान, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) हबशान गॅस सुविधेवरही क्षेपणास्त्राचे अवशेष पडल्याने कामकाज बंद करावे लागले. तसेच सौदी अरेबियानेही आपल्या पूर्व भागात ड्रोन हल्ला उधळून लावल्याचा दावा केला आहे.

गॅस पुरवठ्यावर काय परिणाम होणार?

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) तणावामुळे कतारचा उर्वरित जगाशी संपर्क आधीच तुटलेला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीचे फेलो इरा जोसेफ यांच्या मते, आता कतारचा गॅस पुरवठा या वर्षाच्या मध्यापर्यंत पुन्हा सुरू होणे कठीण दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका वीज निर्मितीसाठी आयातीवर अवलंबून असणार्‍या आशिया आणि युरोपातील देशांना बसणार आहे,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT