Iran Israel US conflict
जेरुसलेम: इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी हे बंदर अब्बास येथे अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत, असा दावा इस्रायली अधिकार्यांच्या हवाल्याने इस्रायली प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र, या हल्ल्याबाबत इराण किंवा इस्रायली लष्कराकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, 'टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची (Strait of Hormuz) नाकेबंदी करण्यासाठी तांगसिरी प्रामुख्याने जबाबदार होते.
तांगसिरी हे इराणच्या अशा मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. आतापर्यंत अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ते बाचवले होते. नौदल कमांडर म्हणून २०१८ पासून ते कार्यरत होते. इराणच्या नौदल रणनीतीत आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या अनेक बड्या कमांडरना अमेरिका-इस्रायलने लक्ष्य केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अली खामेनी यांचे मुख्य सल्लागार अली लारिजानी यांची झालेली हत्या हा इराणी प्रशासनासाठी मोठा धक्का होता. लारिजानी यांच्याकडे दांडगा अनुभव आणि बाह्य जगाशी वाटाघाटी करण्याचे कौशल्य होते. आता लारिजानी आणि इतर नेत्यांची जागा घेणारे नवे चेहरे अधिक 'कट्टरपंथी' असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.