Iran Israel tensions
इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे. यामुळे मध्य पूर्वेत कधीही मोठे युद्ध भडकू शकते? अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने प्रादेशिक अशांततेचे कारण देत त्यांचे राजनैतिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मध्य पूर्वेतील ठिकाणे तात्काळ सोडण्यास सांगितले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की, मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. कारण ते एक धोकादायक ठिकाण असू शकते. तसेच अमेरिका इराणला अण्वस्त्रांचा वापर करु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी इराकच्या बगदादमधील अमेरिकन दूतावासातील सर्व अनावश्यक कर्मचाऱ्यांना इराक सोडण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, अनावश्यक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी खर्चाने बहरीन आणि कुवेतमधून निघण्यास परवानगी देण्यात आल्याची पुष्टीही परराष्ट्र विभागाने केली आहे.
वाढत्या प्रादेशिक तणावामुळे परराष्ट्र विभागाने आपत्कालीन सेवेत नसलेल्या अमेरिकेच्या सरकारी कर्मचाऱ्यांना मध्य पूर्वेतील ठिकाणे सोडण्याचे आदेश दिले आहेत, असे ११ जून रोजी जारी केलेल्या ॲडव्हाजरीमध्ये म्हटले आहे.
इस्रायल इराणच्या अण्विक तळावर हल्ला करण्याची तयारीत आहे, असे स्पष्ट संकेत अमेरिकन गुप्तचर संस्थेने दिले आहेत.
इराणसोबतची अण्वस्त्र चर्चा निष्फळ ठरत असताच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने मध्य पूर्वतील त्यांच्या लष्करी तळांची सुरक्षा वाढवली आहे. जर इस्रायलकडून इराणवर हल्ला झाला तर इराण मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांवरही प्रत्युत्तरादाखल कारवाई करु शकते. जर आमच्या भूमीवर हल्ला झाल्यास अमेरिका त्याला जबाबदार राहील, असा इशारा इराणने दिला आहे. यामुळे मध्य पूर्वेत युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, इराण आणि अमेरिकादरम्यान अण्वस्त्र प्रश्नी चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांदरम्यान चर्चेची सहावी फेरी रविवारी ओमानमध्ये होणार आहे. पण ही चर्चा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.