अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran ceasefire demand: नुकसानभरपाई द्या तरच युद्ध थांबवू! इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या कडक अटी; पाहा काय आहे संपूर्ण प्रस्ताव?

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच, इराणने आता युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर काही महत्त्वपूर्ण अटी ठेवल्या आहेत.

मोहन कारंडे

Iran ceasefire demand

तेहरान: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच, इराणने आता युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर काही महत्त्वपूर्ण अटी ठेवल्या आहेत. रॉयटर्सने इराणी माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने केवळ युद्धविरामच नाही, तर युद्धातील नुकसान भरपाई आणि लादलेले निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीद्वारे हा प्रस्ताव अमेरिकेला पाठवण्यात आला असल्याचे समजते.

प्रस्तावातील प्रमुख मागण्या

इराणची निमलष्करी वृत्तसंस्था 'तस्नीम'ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावात प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश आहे:

इराणने सर्व आघाड्यांवरील युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध तातडीने मागे घ्यावेत.

अमेरिकेच्या 'फॉरेन असेट्स कंट्रोल' कार्यालयाने इराणच्या तेल विक्रीवर घातलेले निर्बंध ३० दिवसांच्या कालावधीसाठी शिथिल करावेत.

इराणच्या सागरी सीमांवरील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे थांबवण्यात यावी.

नुकसानभरपाई आणि 'हॉर्मुझ'च्या सार्वभौमत्वाचा मुद्दा

या प्रस्तावातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे 'युद्धातील नुकसानीची भरपाई'. इराणने म्हटले आहे की, या संघर्षामुळे झालेल्या हानीसाठी अमेरिकेने इराणला भरपाई द्यावी. याशिवाय, जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' या जलमार्गावर इराणच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेने अधिकृत मान्यता द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हा प्रस्ताव सध्या मध्यस्थांमार्फत अमेरिकेला सादर करण्यात आला असला, तरी अद्याप दोन्ही देशांमध्ये कोणत्याही अंतिम करारावर शिक्कामोर्तब झालेले नाही. हॉर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग असल्याने इराणच्या या अटींवर अमेरिका काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT