Indonesia ferry fire : इंडोनेशियातील पूर्व जावा येथील मदुरा बेटाजवळ रविवारी सकाळी एक भीषण सागरी अपघात घडला. सुमारे २७१ प्रवासी आणि कर्मचारी वर्ग असलेल्या 'KMP मटियारा सेंटोसा २' (KMP Mutiara Sentosa 2) या प्रवासी बोटीला (फेरी) समुद्राच्या मध्यभागी अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान ५ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण अद्याप बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच इंडोनेशियाच्या शोध व बचाव पथकांनी व्यापक स्तरावर बचाव मोहीम सुरू केली आहे.
मदुरा बेट हे इंडोनेशियाच्या जावा बेटाच्या ईशान्य किनाऱ्याजवळ स्थित आहे. सागरी वाहतुकीच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे सोशल मीडियावर समोर आलेले व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाहता पाहता संपूर्ण बोटीतून काळा धूर आणि आगीच्या प्रचंड ज्वाला निघू लागल्या. बोटीवरील अनेक प्रवाशांनी लाईफ जॅकेट परिधान केले होते आणि आग पसरल्याने ते बोटीच्या पुढील भागाकडे जमा झाले. आपला जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी थेट समुद्रात उड्या मारल्या.
शोध आणि बचाव यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, बोटीवर एकूण २७१ प्रवासी आणि कर्मचारी उपस्थित होते. यापैकी २२५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम वेगाने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही बोट पूर्व जावा प्रांतातील सुराबाया शहरातून दक्षिण सुलावेसी येथील मकासर शहराकडे जात होती. प्रवासादरम्यान मदुरा बेटाजवळील सागरी क्षेत्रात ही दुर्घटना घडली.
रविवारी सकाळी ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय शोध आणि बचाव यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन (SAR) अविरत सुरू आहे. बेपत्ता सर्व प्रवाशांचा लवकरात लवकर शोध घेता यावा यासाठी बचाव पथक सागरी भागात व्यापक शोध मोहीम राबवत आहे.