ukraine drone attack on russia
मॉस्को : रशियाच्या मॉस्कोमध्ये आज रात्री युक्रेनने केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. रशियातील भारतीय दूतावासाने या घटनेला दुजोरा दिला आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत जखमी कामगारांची विचारपूस केली.
भारतीय दूतावासाने 'X' वर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "दूतावास या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आहे. जखमी आणि बाधित कामगारांना सर्व आवश्यक मदत पुरवण्यासाठी आम्ही कंपनीचे व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत." दरम्यान, मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्या भारतीयांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच या ड्रोन हल्ल्याबाबत अधिक तपशील जारी करणे प्रशासनाकडून बाकी आहे.
रशियन अधिकाऱ्यांच्या मते, रविवारी रात्री झालेला हा हल्ला गेल्या काही महिन्यांतील मॉस्कोवरील युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला होता. या हल्ल्यादरम्यान राजधानी मॉस्को आणि आसपासच्या भागात एअर रेड सायरन (हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन), स्फोटांचे आवाज आणि ड्रोनचे अवशेष पडल्याच्या घटना घडल्या.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी २४ तासांच्या आत देशभरात १,००० हून अधिक युक्रेनी ड्रोनचा मारा हवेतच निकामी केला. मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, हवाई संरक्षण यंत्रणेने राजधानीच्या दिशेने येणारे किमान ८१ ड्रोन पाडले. या हल्ल्यांमुळे अनेक भागांतील निवासी इमारती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या संपूर्ण हल्ल्यात किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, ज्यामध्ये मॉस्को प्रदेशातील तिघांचा समावेश आहे. दुसरा एक मृत्यू युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या रशियाच्या बेळगोरोड भागात झाला.
रशिया-युक्रेन युद्ध मागील चार वर्षांपासून सुरु आहे. रशियाने काही दिवसांपूर्वीच कीव्हवर (Kyiv) आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला होता. या रशियन बॉम्बफेकीनंतर युक्रेनचे अध्यक्ष व्हलोडिमिर झेलेन्स्की यांनी सडेतोड प्रत्युत्तराचा इशारा दिला होता. हा ड्रोन हल्ला त्याच इशाऱ्याचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. 'X' वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झेलेन्स्की यांनी प्रभावित भागातून निघणारा धूर आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे आपत्कालीन पथक दाखवले आहे. रशियाकडून युक्रेनमधील शहरे आणि नागरिकांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांना हे चोख प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी म्हटले होते
झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, "रशियाने लादलेले हे युद्ध आणि आमच्या शहरांवर व समुदायांवर होणाऱ्या हल्ल्यांना आम्ही दिलेले उत्तर पूर्णपणे न्याय्य आहे."युक्रेनच्या अध्यक्षांनी असाही दावा केला की, रशियाच्या कडक हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देत युक्रेनने रशियन सीमेच्या आत ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या लक्ष्यांवर यशस्वीपणे मारा केला आहे.
रशियाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून युक्रेन मुद्दाम नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार (TASS), रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी या हल्ल्याचे वर्णन "मोठा दहशतवादी हल्ला" असे केले आहे.युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आणि युक्रेन या दोघांनीही नागरिकांवर जाणीवपूर्वक हल्ले केल्याचा आरोप नेहमीच फेटाळला आहे.