Indian woman killed in US
नवी दिल्ली : अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका भारतीय तरूणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय निकिता गोडिशला हिचा मृतदेह मेरीलँडमधील तिच्या प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये सापडला आहे. निकिताच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या जखमा आढळल्या आहेत. याप्रकरणी हॉवर्ड काउंटी पोलिसांनी निकिताच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे.
अर्जुन शर्मा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली आणि बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून तो भारतात पळून गेला. त्यानंतर तिचा मृतदेह मेरीलँड येथील त्याच्या फ्लॅटमध्ये आढळून आला.
अर्जुन शर्मा तक्रार नोंदवल्यानंतर लगेच भारतात पळून गेला आहे. पोलिसांनी सांगितले की, अर्जुनने त्याच दिवशी विमानाने पळ काढला. पोलिसांनी त्याच्यावर 'फर्स्ट आणि सेकंड डिग्री मर्डर'चे गुन्हे दाखल केले असून त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेनंतर निकिताची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी म्हटले आहे की, "शर्माने ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास निकिताची हत्या केली. तपास अद्याप सुरू असून हत्येचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही." हॉवर्ड काउंटी पोलीस शर्माचा शोध घेण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी अमेरिकन यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत.