Seattle Space Needle - indian flag  x
आंतरराष्ट्रीय

Seattle Indian Flag | सिएटलच्या 'स्पेस नीडल' वर पहिल्यांदाच फडकला भारतीय तिरंगा

Seattle Indian Flag | किंग काऊंटी, स्पोकेन, टॅकोमा, बेलव्ह्यू शहरांतह 'इंडिया डे' साजरा

पुढारी वृत्तसेवा

Seattle Space Needle Indian Flag

वॉशिंग्टन : भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेतील सिएटल शहरात एक ऐतिहासिक घटना घडली. शहराच्या सुप्रसिद्ध 'स्पेस नीडल' इमारतीवर पहिल्यांदाच भारतीय तिरंगा फडकावण्यात आला. 1962 मध्ये वर्ल्ड फेअरच्या निमित्ताने बांधण्यात आलेली ही इमारत सिएटलच्या आकाशरेषेचे प्रतिक मानली जाते आणि अमेरिका-पॅसिफिक उत्तर-पश्चिम भागाच्या तंत्रज्ञानाधिष्ठित प्रगतीचं प्रतीकही आहे.

या ऐतिहासिक उपक्रमात भारताचे सिएटलमधील कॉन्सुल जनरल, सिएटलचे महापौर ब्रूस हॅरेल, तसेच शहरातील अनेक मान्यवर आणि अधिकारी सहभागी झाले. भारतीय-अमेरिकन समुदायाच्या तांत्रिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत ही घटना साजरी करण्यात आली.

केरी पार्कमध्ये भव्य स्वागत समारंभ

या ऐतिहासिक प्रसंगानिमित्त, सिएटलमधील केरी पार्कमध्ये एक विशेष स्वागत समारंभ पार पडला. या ठिकाणाहून संपूर्ण सिएटलचं विहंगम दृश्य दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर 'स्पेस नीडल'वर फडकणारा भारतीय तिरंगा हे दृश्य उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद ठरलं.

या कार्यक्रमास अमेरिकन काँग्रेसचे खासदार ऑडम स्मिथ (WA-9th district), वॉशिंग्टन सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश डेब्रा एल स्टीफन्स, सिएटल पोर्ट कमिशनर सॅम चो, तसेच सिएटल पार्क्स आणि रिक्रिएशनचे संचालक ए.पी. डायझ हे मान्यवर उपस्थित होते.

ऑडम स्मिथ यांनी आपल्या भाषणात भारतीय तिरंग्याच्या उभारणीचे स्वागत करताना सांगितले की, “ही घटना केवळ भारतासाठी नव्हे, तर सिएटलसाठीही एक अभिमानास्पद क्षण आहे. हे या भागातील विविधतेचं आणि भारत-अमेरिका मैत्रीचं प्रतीक आहे.”

सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीयत्वाचा ठसा

कार्यक्रमात भारतीय आणि अमेरिकन राष्ट्रगीतांच्या गायनानंतर विविध भारतीय कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध कवी, अभिनेते पियूष मिश्रा यांनी खास कविता सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.

सिएटलमध्ये भारताचे वाणिज्य दूतावास सक्रिय

भारत सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये सिएटलमध्ये आपले सहावे वाणिज्य दूतावास स्थापन केले असून, त्यानंतरपासून भारत आणि अमेरिका (विशेषतः पॅसिफिक नॉर्थवेस्ट) यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले आहेत.

वॉशिंग्टनमधील अनेक शहरांत इंडिया डे

केवळ सिएटलच नाही, तर किंग काऊंटी (जो 39 शहरांचा समावेश असलेला प्रशासकीय विभाग आहे), तसेच स्पोकेन, टॅकोमा, बेलव्ह्यू यांसारख्या शहरांनीही अधिकृतरित्या 15 ऑगस्ट हा दिवस 'इंडिया डे' म्हणून घोषित केला.

संपूर्ण शहर तिरंग्याच्या रंगात

स्वातंत्र्यदिनानिमित्त सिएटलमधील लुमेन स्टेडियम, टी-मोबाईल स्टेडियम, वेस्टिन हॉटेल, ग्रेट व्हील, आणि 'स्पेस नीडल' ही प्रमुख स्थळं भारतीय तिरंग्याच्या रंगात उजळून निघाली. याशिवाय टॅकोमा डोम, टॅकोमा सिटी हॉल, आणि टॅकोमा पोलीस आणि फायर डिपार्टमेंट मुख्यालय येथेही भारतीय ध्वज फडकावण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT