Indian Woman Murdered in US: अमेरिकेतील मेरीलँड राज्यात भारतीय वंशाच्या 27 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हावर्ड काउंटी पोलीस विभागाने एका अपार्टमेंटमधून निकिता गोदिशला हिचा रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित तिचा एक्स-बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा असून तो सध्या फरार आहे.
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. निकिताच्या हत्येनंतर संशयित अर्जुन शर्माने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःच निकिता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रार दिल्यानंतर काही तासांतच तो अमेरिका सोडून भारतात पळून गेल्याचं उघड झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारी रोजी 26 वर्षीय अर्जुन शर्माने तक्रार दाखल करत आपण 31 डिसेंबर रोजी शेवटचं निकिताला आपल्या अपार्टमेंटमध्ये पाहिलं असल्याचं सांगितलं. ही तक्रार संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. त्याच दिवशी अर्जुन भारतात आल्याची माहिती समोर आली.
3 जानेवारी रोजी पोलिसांनी कोलंबिया येथील अर्जुनच्या अपार्टमेंटचा तपास केला. तेथे निकिताचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात तिची हत्या चाकूने वार करून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांचा अंदाज आहे की 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजल्यानंतर ही हत्या करण्यात आली. हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. निकिता एलिकॉट सिटीत डेटा आणि स्ट्रॅटेजी अॅनालिस्ट म्हणून काम करत होती.
या प्रकरणात पोलिसांनी अर्जुन शर्माच्या विरोधात फर्स्ट आणि सेकंड डिग्री मर्डरचे अटक वॉरंट जारी केले आहे. आरोपी भारतात पळून गेल्याने त्याला अटक करण्यासाठी आता फेडरल यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. गरज भासल्यास भारतातून प्रत्यार्पण (Extradition) प्रक्रियाही राबवली जाऊ शकते.
या घटनेची दखल घेत अमेरिकेतील भारतीय दूतावासनेही प्रतिक्रिया दिली आहे. दूतावासाने ‘एक्स’वर सांगितलं की, “दूतावास निकिताच्या कुटुंबाच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत केली जात आहे. स्थानिक प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे.” या घटनेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.