Dallas file photo
आंतरराष्ट्रीय

Dallas: वॉशिंग मशीनच्या वादातून अमेरिकेत भारतीय व्यक्तीची निर्घृण हत्या; पत्नी आणि मुलासमोर केला शिरच्छेद

अमेरिकेत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भारतीय मूळच्या मोटल मॅनेजरची त्यांच्या पत्नी व मुलाच्या डोळ्यासमोर हत्या करण्यात आली.

मोहन कारंडे

Dallas

नवी दिल्ली : अमेरिकेत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. टेक्सासमध्ये वॉशिंग मशीनवरून झालेल्या वादातून ५० वर्षीय भारतीय मूळच्या मोटल मॅनेजरची त्यांच्या पत्नी व मुलाच्या डोळ्यासमोर हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून तो सहकारी असल्याचे सांगितले जाते. ही घटना बुधवारी सकाळी डॅलस येथील डाउनटाउन सूट्स मोटलमध्ये घडली.

डॅलस पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रमौळी नागम्मलैया असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे कर्नाटकचे रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच मोटेलमध्ये काम करणाऱ्या ३७ वर्षीय योरडॅनिस कोबोस-मार्टिनेझ नावाच्या कर्मचाऱ्याने नागम्मलैया यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. वॉशिंग मशिन तुटलेली असल्यामुळे नागम्मलैया यांनी ती वापरण्यास नकार दिला. हा संदेश त्यांनी एका महिला सहकाऱ्यामार्फत कोबोस-मार्टिनेझपर्यंत पोहोचवला. यामुळे संतापलेल्या कोबोस-मार्टिनेझने थेट नागम्मलैया यांच्या खोलीत जाऊन त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी नागम्मलैया यांनी मोटेलच्या कार्यालयाकडे धाव घेतली, जिथे त्यांची पत्नी आणि मुलगा उपस्थित होते. नागम्मलैया यांची पत्नी आणि मुलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांना बाजूला ढकलून नागम्मलैया यांच्यावर हल्ला सुरूच ठेवला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोबोस-मार्टिनेझला मॅशेट नावाचे मोठे शस्त्र हातात घेऊन रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला असून, त्याला डॅलस काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आरोपी कोबोस-मार्टिनेझचा यापूर्वीही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. या घटनेमुळे अमेरिकेत भारतीय समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT