Masood Azhar Pudhari
आंतरराष्ट्रीय

Masood Azhar in POK | भारतातील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड मसूद अझर पाकव्याप्त काश्मिरमध्ये; पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड

Masood Azhar in POK | गुप्तचर यंत्रणांचा धक्कादायक खुलासा : बहावलपूरपासून 1000 किमी अंतरावर नवीन अड्डा; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये दिसल्याची माहिती

Akshay Nirmale

Masood Azhar in POK

पुढारी ऑनलाईन न्यूज : भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या ताज्या माहितीप्रमाणे, अझर सध्या पाक व्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कर्दू शहरात लपून बसला आहे. हे ठिकाण त्याच्या पारंपरिक बहावलपूरमधील अड्ड्यापासून तब्बल 1000 किलोमीटर अंतरावर आहे.

या माहितीमुळे पाकिस्तानचा दहशतवादाला पाठबळ देणारा चेहरा पुन्हा उघड झाला आहे.

स्कर्दूच्या सादपारा रोड परिसरात वावर

मिळालेल्या माहितीनुसार, मसूद अझर स्कर्दूतील सादपारा रोड परिसरात काही मदरसे आणि मशिदींमध्ये दिसला आहे.

याच भागात काही खासगी आणि सरकारी गेस्ट हाऊसही आहेत. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या स्कर्दूमध्ये जैशचा प्रमुख इतक्या शांत ठिकाणी लपल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

गुप्त माहितीमुळे भारतात खळबळ

भारतीय गुप्तचर संस्थांनी अझरच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे. दरम्यान, जैशच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून अझरच्या जुन्या भाषणांचे ऑडिओ क्लिप्स पुन्हा प्रसारित करून तो अजुनही बहावलपूरमध्येच असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे.

बहावलपूरमधील जुने ठिकाण ध्वस्त

मसूद अझरचे दोन प्रमुख अड्डे बहावलपूरमध्ये होते. 'जामिया सुब्हान अल्लाह' (जिथे भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान हल्ला केला होता) आणि 'जामिया उस्मान ओ अली', जी त्याच्या जुन्या घराजवळील एक मशिद आहे.

ऑपरेशन सिंदूरमधील भारताच्या हल्ल्यात अझरच्या कुटुंबातील 10 सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानकडून दिशाभूल

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी अलीकडेच अझर अफगाणिस्तानात असण्याची शक्यता व्यक्त करत, "तो जर पाकिस्तानी भूमीवर आढळला तर आम्ही त्याला भारताच्या ताब्यात देऊ," असं वक्तव्य केलं होतं.

मात्र, भारतीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या पाक व्याप्त काश्मीरमध्येच आहे.

दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये सुरक्षित आश्रय

फक्त मसूद अझरच नव्हे, तर हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनही इस्लामाबादमध्ये ऐषआरामात राहत असल्याचे पुरावे भारतीय गुप्तचर संस्थांकडे आहेत. तो बर्मा टाऊन परिसरात बंदूकधारींच्या संरक्षणाखाली वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकेकाळी भारताच्या ताब्यात होता मसूद अझर

मसूद अझर एकेकाळी भारताच्या ताब्यात होता, पण 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सचे विमान IC-814 दहशतवाद्यांनी हायजॅक केल्यानंतर प्रवाशांच्या सुखरूप सुटकेसाठी वाजपेयी सरकारने त्याचा सौदा केला. त्यावेळी त्याला सोडण्यात आले.

त्यानंतर त्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. 2001मधील भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ला, 2016 मधील पठाणकोट एअरबेसवरील हल्ला, 2019 मध्ये पुलवामा येथे भारतीय जवानांवरही दहशतवादी हल्ला या हल्ल्यात अझरचा हात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT