Asian Para Games 2026  
आंतरराष्ट्रीय

Asian Para Games 2026 | आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची सुवर्णभरारी; 62 पदकांसह भारत पाचव्या स्थानावर

Asian Para Games 2026 | सिमरन, दिलीप गावित व सचिन खिलारी सुवर्णपदकांचे मानकरी

पुढारी वृत्तसेवा

नागोया : वृत्तसंस्था
येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये धावपटू सिमरन, उंच उडीपटू प्रवीण कुमार आणि सांगलीचा गोळाफेकपटू सचिन खिलारी यांनी आपल्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे स्पर्धा विक्रम (गेम्स रेकॉर्ड) प्रस्थापित करत सुवर्णपदकांवर आपली मोहोर उमटवली.

सिमरनने महिलांच्या १०० मीटर टी-१२ प्रकारात १२.०२ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी त्याने २०० मीटर शर्यतीतही सुवर्ण जिंकले होते. पुरुषांच्या १०० मीटर (टी-४६/४७) स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य अशा दोन्ही पदकांवर कब्जा केला. २३ वर्षीय दिलीप गावितने १०.६९ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्ण, तर मोहम्मद बासिलने १०.७२ सेकंदांसह रौप्यपदक पटकावले.

याव्यतिरिक्त प्रवीण कुमार (उंच उडी टी-४४/६४), सचिन खिलारी (गोळाफेक एफ-४६) आणि आयुष वर्मा (गोळाफेक एफ-५३) यांनीही सुवर्णपदके जिंकून पदकतालिकेत भारताचा दबदबा निर्माण केला. ट्रॅक अँड फील्ड प्रकारातील ॲथलेट्सच्या तुफानी खेळाच्या जोरावर भारताने एकाच दिवसात तब्बल २२ पदके खिशात घातली. यामध्ये ५ सुवर्णपदकांचा समावेश असून, या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताने एकूण पदक तालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

वैजनाथ काळे यांच्या परिश्रमास यश

दिलीप गावित याने ४०० मीटर धावण्याच्या क्रीडाप्रकारात वैयक्तिक कामगिरी करत सलग दोन वर्ष पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग, पॅरा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय, जागतिक विद्यापीठ, राष्ट्रीय, खेलो इंडिया पॅरा युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक अशी गौरवस्पद कामगिरी केलेली आहे.

तो सध्या पेठच्या बिडकर महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशात क्रीडा संचालक डॉ. नरेंद्र पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. त्याचे डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, सचिव मृणाल जोशी, प्राचार्य डॉ. उपेंद्र लाड, डॉ. गणेश रूपवते यांनी अभिनंदन केले.

सचिनचा सलग दुसऱ्यांदा सुवर्णयशाचा डंका

अपेक्षेप्रमाणे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारीने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णयशाचा आपला डंका वाजविला आहे. गोळाफेक एफ ४६ प्रकारात सचिनसह रूपेरी व कांस्य पदकही भारतीय खेळाडूंनी जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आपल्या पहिल्याच प्रयत्नात सचिनने १५.७१ ही विक्रमी फेकी करून आपले सुवर्णपदक निश्चित केले.

पाठोपाठ मोहम्मद यासरने रूपेरी तर प्रवीणकुमारने कांस्य पदकावर आपले नाव कोरले. महिलांच्या गोळाफेक एफ ३४ प्रकारात नांदेडच्या भाग्यश्री जाधवनेही सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक जिंकले. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८.१९ मीटरची फेकी करीत भाग्यश्रीने रूपेरी यश कमवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT