Rice Pudhari
आंतरराष्ट्रीय

India–USA trade Rice: भारत करतोय अमेरिकेत तांदळाची बरसात, 'डंपिंग'म्हणजे काय?

पीएल ४८० प्रमाणे टेरिफचे हत्यारही बोथट करण्यात यशस्वी होणार का?

पुढारी वृत्तसेवा

वाशिंग्टन डी सी: अनिल टाकळकर

एकेकाळी कमी प्रतीच्या लाल अमेरिकन मिलो गव्हावर अवलंबून असलेला भारत आता जगातील सर्वात मोठ्या तांदूळ निर्यातदारांपैकी एक देश झाला असून, अमेरिकेतील शेतकरी आता भारताविरुद्ध तांदूळ डंपिंग च्या तक्रारी करू लागला आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर तांदूळ उत्पादन होत असल्याचे हे निदर्शक असून देशातील बासमती आणि इतर वाणाच्या तांदळाने केवळ अमेरिकेचेच नव्हे तर जगातील अनेक देशातील रसिक खवय्यांची मने जिंकली आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय तांदळाच्या डंपिंगबाबत अतिरिक्त नवीन आयात शुल्क लावण्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, दशकानुदशकेच्या अमेरिकाभारत अन्नसंबंधात किती मोठा बदल झाला आहे याची आठवण यामुळे होते. १९६० च्या दशकात अन्नमदतीसाठी अमेरिका भारताला कमी प्रतीचा गह पुरवत होती, तेव्हा परिस्थिती नेमकी उलट होती.

अमेरिका आणि भारत व्यापार करारावर चर्चा सुरु असतांना हा विषय उपस्थित झाल्याने या वाटाघाटीला कोणते नवे वळण मिळते, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. या चर्चेत भारताने कृषी आणि दुग्ध आयातींवर ठाम भूमिका घेतली आहे. भारताच्या शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर अनुदाने मिळतात असा अमेरिकेचा दावा आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती उलट असल्याचे दिसते. ट्रम्प यांनी भारतावर डंपिंगचा आरोप करताना दुसरीकडे अमेरिकन शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज जाहीर केले.

डंपिंग म्हणजे एखादा देश आपला जादा माल किंवा उत्पादन अतिशय कमी किमतीत विकतो आणि त्यामुळे आयात करणाऱ्या देशाच्या उत्पादनाला धोका निर्माण होतो. अमेरिकेत देखील तांदळाचा वापर वाढला आहे. कधीकाळी अमेरिकन आहारात तांदूळ दुय्यम होता; परंतु १९७९ नंतर तांदूळनिर्भरता दुपटीहून अधिक वाढली आहे. एकेकाळी भारत अमेरिकेकडून मदत घेत होता, आज तो अमेरिकेचा बासमती व बिगर बासमती तांदळाचा मोठा पुरवठादार आहे.

अमेरिकेच्या कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत दरडोई तांदूळ वापर १९७० मधील ५.२ किलोवरून २०२३- व २४ मध्ये ११.८ किलोपर्यंत वाढला आहे. आशियाई व हिस्पॅनिक लोकसंख्येचा वाढता वाटा, ग्लुटेन-फ्री ला अधिक पसंती आणि नवीन तांदूळ उत्पादने यामुळे ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.

  • सहा दशकांपूर्वी अमेरिकेच्या सार्वजनिक कायदा ४८० 'फूड फॉर पीस' कार्यक्रमांतर्गत अमेरिका भारताला हा लाखो टन गहू पाठवत असे. एका टप्प्यावर भारताला दरवर्षी १ कोटी टनांहून अधिक लालसर, कमी प्रतीचा 'लाल गह' मिळत असे. या गव्हाच्या कडक, लाल रंगाच्या पोळ्या बनत. या गव्हामध्ये 'काँग्रेस गवत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्थेनियमच्या बिया मिसळलेल्या असत.

  • यानंतर, डॉ स्वामीनाथन यांच्या पुढाकाराने हरित क्रांतीच्या माध्यमातून भारताने शेतीक्षेत्रात उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढविली आणि भारत गहूतांदळाचा मोठा जागतिक निर्यातदार बनला. आज भारत दरवर्षी २ कोटी २० लाख टनांहून अधिक तांदूळ निर्यात करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT