India Pakistan War:
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्ताननं भारतासोबत मोठ्या युद्धाची शक्यता नाकारू नये असा इशारा दिला. दक्षिण आशियात तणाव वाढत आहे पाकिस्ताननं पूर्णपणे सतर्क राहिलं पाहिजे असं मत देखील ख्वाजा यांनी नोंदवलं.
समा टीव्हीला दिलेल्यामुलाखतीत असिफ म्हणतात, 'आम्ही भारताकडे दुर्लक्ष करत नाहीये किंवा सद्य परिस्थितीवर पूर्णपणे विश्वास ठेवून आहोत असंही नाही. माझ्या विश्लेषणानुसार मी भारतासोबत मोठं युद्ध होणार ही शक्यता नाकारत नाही. यात सीमेत घुसून देखील हल्ला होऊ शकतो. विशेष करून अफगाणिस्तान असं करू शकतं. त्यामुळं आपल्याला पूर्णपणे अलर्ट मोडवर राहिलं पाहिजे.'
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे हे वक्तव्य भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या ऑपरेशन सिंदूर हे फक्त ८८ तासांचं ट्रेलर असल्याच्या वक्तव्यानंतर आलं आहे. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचा दावा देखील केला होता.
दहा नोव्हेंबरला दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात १५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. पहलगामनंतरचा हा भारताच्या भूमीत झालेला दुसरा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीला असिफ यांनी पाकिस्तान युद्धाचा सराव करत असल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, 'आम्ही तयार आहोत. आम्ही दोन्ही पूर्व आणि पश्चिम सीमेवर युद्धासाठी सज्ज आहोत. युद्धाच्या पहिल्या फेरीवेळी अल्लाहनं आमची साथ दिली. आता दुसऱ्या हल्ल्यात देखील देतील. त्यांना जर युद्धच हवं असेल तर आमच्याकडे देखील युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही.'
असिफ यांची ही सगळी वक्तव्ये पाकिस्तान अन् अफगाणिस्तान यांच्यात वाढत्या तणावानंतर आली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान यांच्यात चकमक झाली होती. त्यात दोन्ही बाजूंनी मोठी जीवित हानी झाली होती. यानंतर कतारमध्ये दोन्ही देशांमध्ये सीज फायरसाठी बोलणी झाली. यासाठी कतार आणि तुक्रीयेनं मध्यस्थी केली होती.
पाकिस्ताननं अफगाणिस्ताननं त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती. पाकिस्ताननं सीमा पार एअर स्ट्राईक करून अफगाणिस्तानात हल्ला केला होता. त्यानंतर अफगाणिस्ताननं देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
अफगाणिस्ताननं पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी हा पाकिस्तानात हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर झाल्याचा दावा फेटाळून लावला. त्यांनी इस्लामिक अमिरेट दुसऱ्या देशाच्या अंतर्गत भानगडीत हस्तक्षेप करत नाही असं देखील ठणकावलं होतं.
दरम्यान, असिफ यांनी अफगाणिस्ताननं केलेल्या हल्ल्यात भारताचा देखील हात असल्याचा आरोप केला होता. त्यांनी पाकिस्तानला दोन फ्रंटवर युद्ध करावं लागण्याची शक्यता बोलून दाखवली होती. भारताला पाकिस्तान अन् अफगाणिस्ताननं त्यांचे वाद सोडवावेत असं वाटत नाही असेही वक्तव्य केले होते.